मुंबई : कुर्ला मदर डेअरीची २१ एकर जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी न देता तेथे उद्यान उभारावे अशी मागणी कुर्लावासीय सातत्याने करीत आहेत. या मागणीसाठी पाठपुरावा करूनही राज्य सरकार दखल घेत नसल्याने अखेर या प्रश्नाबाबत लोक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी धारावीच्या नावे कसा जमीन घोटाळा होत आहे याची माहिती कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना दिली. घरे रिकामी करण्याच्या नोटीसा बजावलेल्या शासकीय कर्मचाऱ्या्ंनी आपल्या अडचणी यावेळी मांडल्या. त्यावर राज ठाकरे यांनी लवकरच या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन कर्मचारी, लोक चळवळीच्या कार्यकर्त्यांना दिले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर भाडेतत्वावर घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार मुलुंड, कांजूरमार्ग, भांडूप आणि कुर्ल्यासह अन्य ठिकाणची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) देण्यात आली आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची २१ एकर जागा डीआरपीला हस्तांतरित करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच कुर्लावासीयांनी ही जागा धारावीसाठी देण्यास विरोध दर्शविला आहे. तर या जागेत बोटॅनिकल गार्डन तयार करण्याची मागणीही रहिवाशांनी केली होती. या मागणीसाठी रहिवाशांनी लोक चळवळीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले.
पोस्ट कार्ड आंदोलनापासून कुर्ला ते वर्षा निवासस्थान निवेदन पदयात्रा काढण्यात आली. मात्र तरीही सरकारने रहिवाशांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यात कुर्ला मदर डेअरीच्या जागेतील शासकीय कर्मचाऱ्यांना घरे रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. शाळा सुरू असताना अचानक मध्येच घरे कशी सोडायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अखेर कर्मचारी आणि लोक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.
कुर्ला मदर डेअरची २१ एकर जागेची बाजारभावाप्रमाणे किंमत २५ हजार कोटी रुपये इतकी आहे. पण ही जागा अदानी समुहासाठी शासन निर्णय काढून कवडीमोल भावात, ५६ कोटीत देण्यात आल्याची माहिती यावेळी लोक चळवळीकडून पुराव्यासह देण्यात आली. तर नोटीसा काढून सातत्याने घरे रिकमी करण्यासाठी दबाव आणण्यात येत असल्याची व्यथाही मांडण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी लोक चळवळीकडून राज ठाकरे यांना देण्यात आले. कुर्ला मदर डेअरीची जागा देण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंतीही रहिवाशांनी केली. त्यानुसार लवकरच याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी रहिवाशांना दिले.