ठाणे येथील कळवा भागात बुधवारी दुपारी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हवालदाराने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेत तिचा मृत्यू झाला असून भाजी आणण्याच्या क्षुल्लक कारणावरून पतीसोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अर्चना हिवरे (२३) असे यातील महिलेचे नाव असून ती मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत होती. तिचे पती श्रीराम हिवरे (२५) हे सुद्धा पोलीस हवालदार असून ते ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सहा महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ते कळवा येथील घोलाईनगरमधील अपर्णाराज इमारतीत राहत होते. बुधवारी दुपारी तिने राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला.
लग्नानंतर हिवरे दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणांवरून भांडणे होत होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकरणी तिचा पती श्रीरामला ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले.