मुंबई : लाडक्या बहिणींमुळेच राज्यात आम्ही सत्तेवर आलो असून तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता आम्ही सगळे भाऊ सातत्याने कार्यरत आहोत. लाडकी बहीण योजना यापुढेही चालू राहील तसेच योग्य वेळी मानधनातही वाढ केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
या योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्याचे पैसे रोखण्यात आले असले तरी जिल्हाधिकारी स्तरावर होणाऱ्या फेरतपासणीत पात्र ठरणाऱ्या महिलांना पुन्हा पैसे सुरू केले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या योजनेत कोणताही घोटाळा नसून विरोधकांच्या डोक्यात घोटाळा आहे. या योजनेत आडकाठी आणणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहण्याचा इशाराही फडणवीस यांनी या वेळी महिलांना दिला. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात फडणवीस बोलत होते. पालकमंत्री आशिष शेलार, आमदार मिहिर कोटेचा आदी यावेळी उपस्थित होते.
आमच्या सरकारला सत्तेवर आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालयात गेले. तेथे काही जमले नाही म्हणून आता या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आहेत. मात्र या योजनेत कोणाताही भ्रष्ट्राचार झालेला नसून या योजनेतील पैसे कोणाचाही खात्यात जात नाहीत. केवळ सरकारी तिजोरीतीतून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जातात, असे फडणवीस म्हणाले.
या योजनेत नाही तर विरोधकांच्या डोक्यात भ्रष्टाचार आहे किंबहुना एवढी मोठी अडीच कोटी महिलांची योजना एक रुपयाचाही भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचे त्यांना दुःख वाटते. भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृती करणारे कोण आहेत याचा फरक लाडक्या बहिणींना समजतो. म्हणून कोणी कितीही खोटे बोलले अपप्रचार केला तरी सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्र सारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाहीत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यात एक कोटी लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार
महिलांच्या नावावर काही पुरुषांनी पैैसे घेतले असून काहींनी आपण पुरुष आहे हे ओळखले जाऊ नये म्हणून चक्क मोटरसायकलचा फोटो लावला आहे. अशा सगळ्यांना हुडकून काढले असून त्यांचे पैसे थांबवले आहेत. तरीही एखाद्या बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबवू नये असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. प्रत्येकाची पडताळणी करा आणि त्यात पात्र ठरणाऱ्यांंना पैसे देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महिला बचत गटांसाठी दहा जिल्ह्यांमध्ये बचत गटाचे मॉल तयार करणार असून तेथे बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करण्याची संधी महिलांना मिळणार आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये २५ लाख लखपती दीदी तयार केल्या असून यावर्षी पुन्हा २५ लाख लखपती दीदी तयार करणार आहोत. येत्या काळात राज्यात एक कोटी लखपती दीदी तयार करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.