डोंबिवली येथील संतोष विचिवारा या तरुणाच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार तरुणीनेच आपली छेडछाड झाली नसल्याचा खळबळजनक जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताचा स्पष्ट इन्कार केला असून हे प्रकरण छेडखानीमुळेच झाल्याचा दावा केला आहे.
संतोष आणि त्याची ‘ही’ मैत्रीण सोमवारी रात्री डोंबिवलीतील नवनीतनगरात जात असताना मुलांच्या टोळक्याने तिची छेड काढली. छेडछाड करण्याबद्दल जाब विचारणाऱ्या संतोषला टोळक्याने जबर मारहाण केली. त्यात तो मृत्युमुखी पडला. या सर्व प्रकरणाची चौकशी मानपाडा पोलीस करत आहेत. संतोषच्या मृत्यूने प्रचंड घाबरलेल्या या तरुणीने मानपाडा पोलिसांकडे गुरुवारी दिवसभरात तीन वेगवेगळे जबाब नोंदवले. त्यातील एक म्हणजे आपली छेड कोणी काढलीच नव्हती असा आहे. आपण मोबाइलवर बोलत असल्याने संतोष आणि त्या मुलांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला याची माहितीच आपल्याला नसल्याचेही या तरुणीने पोलिसांना सांगितले. तिच्या या जबाबामुळे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, मानपाडा पोलिसांनी संतोषच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या टोळक्याने संतोषला वाचवण्यासाठी पुढे आलेले जयंतीलाल छेडा यांनाही मारहाण केली असून ते जखमी आहेत.