छोटा राजन टोळीतील गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याच्या बनावट चकमकीप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर यांचे गुरुवारी सकाळी जे. जे. इस्पितळात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना पक्षाघाताचा झटकाही आला होता. तुरुंगात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुंबईच्या जे. जे. इस्पितळात हलविण्यात आले होते.
लखनभय्या चकमकप्रकरणी दोषी ठरल्यानंतर सरवणकर यांची तळोजा रुग्णालयात रवानगी झाली होती. तेव्हापासून ते मलेरियाने आजारी होते. मलेरियातून बाहेर पडलेल्या सरवणकर यांना ४ सप्टेंबर रोजी पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे कमरेपासून पायापर्यंत त्यांची हालचाल मंदावली. त्याबाबतही वेळीच उपचार मिळाले असते तर ते त्यातून सहिसलामत बाहेर पडले असते. परंतु तुरुंग प्रशासनाने वेळीच हालचाल केली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांना दररोज आठ हजार रुपयांच्या इंजेक्शनची आवश्यकता होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांचा आजार बळावला. उपचारासाठी त्यांना वाशी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथेही त्यांच्यावर नीट उपचार न झाल्याने प्रकृती आणखी खालावली. अखेरीस त्यांना जे. जे. इस्पितळात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सरवणकर यांचा थेट चकमकीत संबंध प्रस्थापित झाला नव्हता. त्यामुळे अपिलात आपल्याला न्याय मिळेल, असे त्यांना वाटत होते. त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते हैराण झाले होते. तुरुंगात नीट उपचार मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. जे. जे. इस्पितळातील उपचारावर सरवणकर कुटुंबीयांनी साडेतीन लाख रुपये खर्च केला होता. या खर्चाबाबतही वेळोवेळी तुरुंग प्रशासनाने आखडता हात घेतला होता. त्यामुळे सरवणकर यांनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. परंतु तो अर्जही गृहखात्याकडे प्रलंबित होता, असे सूत्रांनी सांगितले.
तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या बहुतांश कैदी आजारी असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी हे हृदयविकाराने आजारी आहेत. परंतु त्यांनाही नीट उपचार मिळत नसल्याचे समजते. दरम्यान, तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या भावाचा बळी गेल्याचा आरोप अरविंद यांचे बंधू शरद सरवणकर यांनी केला. अनेक राजकीय नेत्यांनी आश्वासन दिले. परंतु नंतर कोणीही फिरकले नसल्याचेही ते म्हणाले.