माटुंग्यात एकट्या राहणाऱ्या ८३ वर्षांच्या आजींना पोलिसांनी तिच्या वाढदिवशी ‘सरप्राइज पार्टी’ देऊन चकित केले. मुंबईतील माटुंग्यामध्ये राहणाऱ्या ललिता सुब्रमण्यम यांचा २ जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्या नेहमीप्रमाणे आपल्या घरात एकट्या बसलेल्या होत्या तेव्हा माटुंगा पोलीस तेथे आले आणि त्यांनी आजींसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
मुंबई पोलिसांनी वरिष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी एक यादी केली आहे. त्यामध्ये सुब्रमण्यम या देखील आहेत. त्यांना काय हवे नको ते देणे, दवाखान्यात नेणे, त्यांना औषधी आणून देणे यासारखी कामे मुंबई पोलीस करते. तेव्हाच आजींची आणि माटुंगा पोलिसांची ओळख झाली. ललिता सुब्रमण्यम यांना प्रेमाने ‘माटुंगा पोलिसांची आई’ असे म्हटले जाते.
https://twitter.com/MumbaiPolice/status/815920018059735041
ललिता सुब्रमण्यम या गेली २५ वर्षे माटुंग्यातील आपल्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. दोन मुले आहेत त्यापैकी एक अमेरिकेत असतो आणि दुसरा बंगळुरूमध्ये असतो. गेल्या काही वर्षांपासून त्यांची मुले वाढदिवसाला भेटायला आली नाही तेव्हा माटुंगा पोलिसांनीच आपणच आपल्या आईला भेट द्यावी असे ठरवले आणि पूर्ण पोलीस स्टेशनने त्यांची घरी हजेरी लावली. आपल्यासाठी आणलेला केक आणि पुष्पगुच्छ पाहून त्या भारावून गेल्या. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत ललिता सुब्रमण्यम यांनी केक कापला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एम. काकड आणि इतर पोलीस यावेळी उपस्थित होते.
ललिता सुब्रमण्यम या मला माझ्या आईसारख्याच आहेत असे काकड यांनी म्हटले. आम्ही केलेल्या या छोट्याशा समारंभामुळे त्या आनंदित झाल्या असे काकड यांनी म्हटले. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वरिष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइन तयार केली होती. आपल्या भागात असणाऱ्या वरिष्ठ नागरिकांची यादी करावी आणि त्यांची काळजी घ्यावी असे आर. आर. पाटील यांनी आदेश काढले होते.