ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांना शनिवारी ‘स्वरमाऊली’ सन्मानाने गौरविण्यात आले. मुंबईत लता मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ निवास्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अन्य मंगेशकर कुटुंबीय आणि विद्याावाचस्पती शंकर अभ्यंकर उपस्थित होते.

पुरस्कार स्विकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना लता दीदी म्हणाल्या, या आधी जगद्गुरु शंकराचार्य यांनी मला ‘स्वरभारती’ सन्मानाने गौरविले होते. आता ‘स्वरमाऊली’ या महत्वाच्या सन्मानासाठी माझी निवड केली आणि हा सन्मान प्रदान करण्यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वत: मुंबईत आले त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे.

पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, शंकराचाऱ्यांनी आमचे वडील दीनानाथ मंगेशकर यांना ‘संगीतरत्न’ सन्मानाने तर मला ‘भावगंधर्व’ सन्मानाने गौरविले होते. या सन्मानांमुळे आम्ही मंगेशकर कुटुंबीय कृतकृत्य झालो आहोत.