गोरेगाव येथे टोलेजंग इमारतीचे रंगकाम सुरू असताना गुरुवारी रात्री मालवाहू उद्वाहन कोसळून झालेल्या अपघातात दोन मजूर ठार तर चार जण जखमी झाले. जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोरेगाव येथील वेस्ट इन हॉटेलनजीक ३२ मजली टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या टॉवरचे रंगकाम सुरू आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रंगकामासाठी वापरण्यात येत असलेले मालवाहू उद्वाहन अचानक कोसळले. त्यामध्ये काही मजूर होते. उद्वाहन कोसळताच त्यातील एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. पाच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम मोरे यांनी दिली.