टिटवाळयाहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्याची घटना ताजी असतानाच आता विरार स्टेशनवर थांबलेल्या लोकल ट्रेनमध्ये ९ एमएमचे जिवंत काडतूस सापडले आहे. एका बंद प्लास्टिकच्या पाकिटात हे काडतूस ठेवण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी दादर लोकल विरारच्या प्लॅटफॉर्म नंबर ६ वर थांबलेली असताना चारच्या सुमारास एका बंद पाकिटात हे काडतूस सापडले.

लोकलमधील प्रवाशांचे डब्ब्यातील बंद पाकिटावर लक्ष गेले. त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी हे प्लास्टिक पॅकेट प्लॅटफॉर्मवर आणून उघडल्यानंतर त्यामध्ये ९ एमएमचे जिवंत काडतूस सापडले. जिवंत काडतूस सापडल्यामुळे रेल्वे पोलीस आणि विरार पोलिसांनी संपूर्ण ट्रेनची तपासणी केली.

बॉम्ब शोधक आणि निकामी पथकालाही पाचारण करण्यात आले होते. ते पॅकेट ट्रेनमध्ये कोणी सोडले हे शोधण्यासाठी पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत असे सूत्रांनी सांगितले. मागच्या आठवडयात टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्यामुळे लोकलमधल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं.

टिटवाळ्याहून ८ वाजून ३३ मिनिटांनी सीएसएमटी लोकल निघाली. लोकल ठाणे स्थानकावर पोहोचली तोपर्यंत कोणाचं लक्ष नव्हतं. पण नंतर एका प्रवाशाचं लोकलमधल्या फॅनकडे लक्ष गेलं आणि त्याने आरडाओरड करत फॅनमध्ये साप असल्याचं इतरांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.