मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित नागरिकाने ते कासव वन विभागाकडे सुपूर्द केले.
चेंबूर परिसरात नुकतेच ल्युसिस्टिक कासव सापडले होते. सध्या हे कासव रेस्क्यूइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ (रॉ) या संस्थेकडे असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. संस्थेने कासवाची वैद्यकीय तपासणी केली असून प्राथमिक अहवालानुसार कासवाच्या कवचाला इजा झाली आहे. अपुरा आहार, दूषित पाणी यामुळे कासवाची प्रकृती बिघडल्याचे रॉचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले. तसेच अयोग्य ठिकाणी ठेवल्यामुळे आणि योग्य पद्धतीने संगोपन न केल्यामुळे कासवाची प्रकृती बिघडल्याचे त्यांनी सांगितले.
ल्युसिस्टिक अनुवंशिक स्थिती
ल्युसिस्टिक आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे शरीरातील रंगद्रव्य कमी होऊन त्वचेचा रंग पांढरा किंवा ठिकठिकाणी फिकट दिसतो. प्राण्याच्या त्वचेत, केस, पिसांमध्ये किंवा कवचामध्ये रंगद्रव्यांचे प्रमाण कमी होते. अल्बिनिझमप्रमाणे संपूर्ण रंगद्रव्याचा अभाव नसतो. विशेष म्हणजे ल्युसिस्टिक प्रजातीतील प्राण्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत नाही, अल्बिनिझममध्ये प्राण्याचे डोळे सामान्यत: गुलाबी किंवा लालसर दिसतात.
कासवांमधील ल्युसिझम
– कासवांच्या प्रजातींमध्ये ल्युसिझम फारच दुर्मीळ आढळते.
– ल्युसिझम झालेल्या कासवांना सूर्यप्रकाशाचा त्रास होते. त्यामुळे हे कासव नैसर्गिक परिस्थितीत तग धरू शकत नाही.
ल्युसिस्टिक कासवांचे नैसर्गिक वर्तन
– सामान्य कासव जलचर असते. ते तलाव, नदी, दलदलीत आढळते.
– ल्युसिस्टिक कासवांमध्ये दृष्यदोष नसला तरी, रंगामुळे ते गटात मिसळत नाहीत यामुळे सामाजिक वर्तनात फरक पडतो.
– नैसर्गिक वातावरणात तग धरायला अशा कासवांना अधिक आधार किंवा विशेष व्यवस्थापन लागते.
ल्युसिस्टिक कासव दुर्मीळ का ?
– भारतात कासव सामान्य आहे, पण त्यामध्ये ल्युसिस्टिक प्रकार फारच दुर्मीळ – अशी काही उदाहरणे महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये क्वचितच नोंदवली गेली आहेत.
– वन्यजीव अभ्यासक अशा प्रकारणांचे दस्ताऐवजीकरण करून जैवविविधतेच्या अभ्यासात महत्त्वाची भर घालतात.
ल्युसिस्टिक प्राणी कोणते
पक्षी, सस्तन प्राणी, मासे, सरपटणारे प्राणी अशा विविध प्रजातींमध्ये ल्युसिझम आढळते. उदा, पांढरे मोर, ल्युसिस्टिक साप, कासव आदी.
प्रजनन क्षमतेवर परिणाम नाही
ल्युसिझम फक्त शरीराच्या रंगावर परिणाम करते. या स्थितीमुळे त्या प्राण्याच्या आरोग्यावर किंवा प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होत नाही. पण शिकार करणे, स्वत:चे संरक्षण करण्याचे प्रयत्न कमी पडतात.
भारतामध्ये कायदेशीर संरक्षण
भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार अशा दुर्मीळ प्राण्यांची तस्करी, विक्री किंवा बंदिवासात ठेवणे हा गुन्हा आहे. यामध्ये दोषींवर कठोर कारवाई होते.
नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची?
– चेंबूरमधील नागरिकाने योग्य वेळी हस्तक्षेप केला नसता तर हे कासव मृत्युमुखी पडले असते.
– असे प्राणी सापडल्यास वन विभाग / १९२६ मदतक्रमांकावर , जवळच्या प्राणी संस्थेशी संपर्क करणे गरजेचे असते.
– बरेचदा विशेष प्राणी म्हणून नागरिक त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात मात्र,ही कृती कायद्याने गुन्हा आहे.