सीएसटी अपघातप्रकरणी मोटरमनची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गार्ड गाडी चालवत असल्याचे माहीत नसल्याचा दावा

‘प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आलेली लोकल रात्री सव्वादोनच्या सुमारास बाहेर काढून मी मोटरमन केबिनमधून खाली उतरलो.. ही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर नेण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या यार्डमधून विरुद्ध दिशेच्या केबिनकडे चालायला लागलो.. एवढय़ात उभी असलेली गाडी चालू झाली आणि काही कळायच्या आतच ‘धडाम्’ आवाज आला..’ छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातातील लोकलच्या मोटरमनचा हा खुलासा अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील दोषी गार्डवर कारवाई करण्याबरोबरच हा निष्काळजीपणा फोफावण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी थेट रेल्वे कामगार संघटनांनी केली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर आलेली गाडी न थांबता बंपरला धडकली. या धडकेमुळे बंपर तुटून ती गाडी प्लॅटफॉर्मवरही चढली होती. ही गाडी मोटरमनऐवजी गार्ड चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी गार्ड शंकर नाईक आणि मोटरमन विजय खानोलकर या दोघांना निलंबित करून त्यांच्याकडून या प्रकरणी खुलासाही मागवला होता.
खुलासा करताना मोटरमन विजय खानोलकर यांनी, ही गाडी गार्ड चालवत असल्याचे आपल्याला माहीतच नव्हते, असा धक्कादायक जबाब नोंदवला आहे. खानोलकर यांच्या जबाबानुसार त्यांनी ही गाडी कसाऱ्याहून मुंबईला प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आणली. त्यानंतर संपूर्ण प्लॅटफॉर्म चालून विरुद्ध दिशेच्या केबिनमध्ये जात ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून दुरुस्तीसाठी बाहेर काढली. पुढील सूचना मिळाल्यानुसार गाडी पुन्हा प्लॅटफॉर्म पाचवर घेण्यासाठी ते पुन्हा विरुद्ध दिशेच्या केबिनमध्ये जाण्यास उतरले. यार्डमधून चालत असताना त्यांना अचानक गाडी चालू झाल्याचे निदर्शनास आले. अवाक् होऊन ही घटना पाहत असताना पुढे गेलेली गाडी आपटून मोठा आवाज झाल्याचेही त्यांनी ऐकले आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने धाव घेतली.
याबाबत रेल्वेतील काही कर्मचारी व अधिकारी यांना विचारले असता मोटरमनच्या संमतीने गार्डने गाडी चालवण्याचे धडे घेणे, गार्डने रात्रीच्या वेळी गाडी चालवणे या गोष्टी सर्रास घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे रेल्वे कामगार संघटनांनीही या गोष्टींवर ताशेरे ओढत असल्या जीवघेण्या गोष्टी बंद करायला हव्यात, असा पवित्रा घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local start automatically
First published on: 10-12-2015 at 05:19 IST