दुसऱ्या टप्प्यात ४८, तर अंतिम टप्प्यात १२ फलाटांची उंची वाढवण्याचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातास कारणीभूत ठरणारी फलाट आणि रेल्वे गाडय़ांदरम्यानची पोकळी फलाटांची उंची वाढवून भरून काढली जाणार आहे. मध्य रेल्वेवर जून, २०१८ पर्यंत सर्व स्थानकांवरील पोकळी भरून काढली जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यादरम्यान स्पष्ट केले. मध्य रेल्वेने पहिल्या टप्प्यात ८० फलाटांची उंची वाढवली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ४८ व अंतिम टप्प्यात १२ फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे. हे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल.

करी रोड, नाहूर व विरारमधील पादचारी पुलांसह मध्य रेल्वेवरील विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण बुधवारी गोहेन यांच्या हस्ते आले. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत, डॉ. श्रीकांत शिंदे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन आदी उपस्थित होते.

येत्या काळात ४७ वातानुकूलित गाडय़ा उपनगरीय प्रवाशांना मिळणार आहेत, तर मार्चपर्यंत आणखी ८ तर जूनपर्यंत १३ नवे पादचारी पूल मिळणार आहेत, असे गोहेन यांनी स्पष्ट केले. हँकॉक पूल उभारण्याकरिता रेल्वेने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या प्रवासी सुविधांचे लोकार्पण

करी रोड, नाहूर व विरारमधील नवे पादचारी पूल, टिटवाळा, ठाकुर्लीतील सरकते जिने, करी रोड, भांडुप, नाहूर, ठाकुर्ली येथील तिकीट खिडक्या, वसई, विरार, कल्याण येथील प्रसाधनगृहे, चेंबूर, डोंबिवली, घाटकोपर, मुलुंडमधील वायफाय सेवा आणि मुंबई सेंट्रल, दादर, चर्चगेट, वांद्रे टर्मिनस, अंधेरी येथील सौरऊर्जा प्रकल्प यांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले.

पुनर्वसन धोरण ठरवा

ठाण्याच्या पुढील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मोठय़ा असून त्याकरिता पाचवी आणि सहावी मार्गिका लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. ऐरोली ते कळवा उन्नत मार्गाचा प्रकल्प मंजूर होऊनही गेली दोन वर्षे रखडला आहे. मात्र आपल्या मतदारसंघातून जाणाऱ्या या मार्गाकरिता गावकऱ्यांना घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. लोक आपली घरे देण्यासाठी तयार आहेत; परंतु रेल्वेचे पुनर्वसनाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचले नसल्याचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train and platform gap indian local
First published on: 15-12-2017 at 02:35 IST