अ‍ॅप डाऊनलोड करणारे पाच लाख, तिकीट काढणारे अवघे ११ हजार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्यांना तिकीट खिडकीसमोर रांग लावण्याची वेळ न येता, स्थानकात शिरण्यापूर्वीच त्यांना तिकीट घेता यावे, यासाठी रेल्वेने सुरू केलेले ‘यूटीएस’ अ‍ॅप अद्याप प्रभावी ठरू शकलेले नाही. एकीकडे हे अ‍ॅप आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ५ लाख ६८ हजार ८६८ इतकी आहे, मात्र प्रत्यक्ष या अ‍ॅपवरून मोबाइल तिकीट काढलेल्यांची संख्या जेमतेम ११ हजार इतकीच आहे. त्यामुळे अ‍ॅपबाबत उत्साह असला तरी त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसले आहे. या पाश्र्वभूमीवर मध्य व पश्चिम रेल्वेने मोबाइल तिकीट अ‍ॅपबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अ‍ॅपवरून उपनगरीय रेल्वेचे तिकीट काढून प्रवाशांना थेट प्रवास करता यावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने ‘यूटीएस’ हे अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपमधील ‘आर वॉलेट’मध्ये ठरावीक रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर या अ‍ॅपवरून रेल्वेचे तिकीट सहज काढता येते. सुरुवातीला मोबाइल अ‍ॅपवरून काढलेले तिकीट मोबाइलवरच प्रदर्शित होत असे व तिकीट निरीक्षकालाही ते दाखवता येत असे. मात्र यामध्ये तांत्रिक अडथळे येऊ लागल्याने रेल्वेने या अ‍ॅपमधून काढलेल्या तिकिटाची छापील प्रत रेल्वे स्थानकातील ‘एटीव्हीएम’ यंत्रातून घेण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. मात्र तरीही या अ‍ॅपचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झालेली नाही.

अ‍ॅपवरून तिकीट काढताना मोबाइलवरील जीपीएस नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत होता. मात्र रेल्वेच्या ‘क्रिस’ विभागाने ही तांत्रिक अडचणही दूर केली. त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यास सोयीस्कर होईल असे बदलही यात करण्यात आले, मात्र अजूनही या अ‍ॅपसेवेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप ५ लाख ६८ हजार ८६८ जणांनी डाऊनलोड केले असल्याचे ‘क्रिस’चे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले. तर मध्य रेल्वे मार्गावरील ६ हजार ६०० आणि पश्चिम रेल्वेवरील ४ हजार ६३७ प्रवाशांकडून लोकलचे तिकीट काढले जात आहे. हा आकडा गेल्या काही महिन्यांत हळूहळू वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लांब पल्ल्याचे तिकीट देण्याची सुविधा यात नाही. त्यावर गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. पुढील वर्षांत प्रवाशांना तीदेखील सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train mobile ticketing get low response
First published on: 04-11-2017 at 04:56 IST