मुंबई : जगभरातील गणितज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी आणि गणितक्षेत्रात सखोल संशोधन करण्यासाठी लोढा फाऊंडेशनतर्फे मुंबईतील वडाळा येथे लोढा गणितीय विज्ञान संस्थेची (लोढा मॅथेमॅटिकल सायन्स इन्स्टिट्यूट) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गणितातील मूलभूत समस्यांवर काम करून निराकरण केले जाणार आहे. ही संस्था प्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. व्ही. कुमार मूर्ती यांच्या नेतृत्वात काम करणार आहे.

लोढा गणितीय विज्ञान संस्था ही खासगी निधीच्या माध्यमातून स्थापन झालेली भारतातील पहिली खासगी गणित संशोधन संस्था आहे. या संस्थेच्या सल्लागार समितीत जगभरातील नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक व गणितज्ज्ञांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. मंजुल भार्गव (प्रिन्स्टन विद्यापीठ), डॉ. विक्रमन बालाजी (चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट), डॉ. सौरभ चॅटर्जी (स्टॅनफर्ड विद्यापीठ) आदींचा समावेश आहे. या संस्थेचे उद्घाटन रविवारी (१७ ऑगस्ट) मुंबईत झाले. यावेळी लोढा गणितीय विज्ञान संस्था विकसित भारताच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच या संस्थेत संशोधकांना कोणत्याही प्रशासकीय अडथळ्यांशिवाय मुक्त संशोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे.

‘भारताला विकसित व सक्षम राष्ट्र बनवायचे असल्यास सर्जनशीलता व संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. हेच जाणून लोढा गणितीय विज्ञान संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गणितातील मूलभूत व प्रगत संशोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. जगभरातील गणितज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी विशेष उपक्रमही राबविण्यात येतील. तसेच गणिताशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद डिसेंबर २०२६ मध्ये आयोजित करणार आहोत’, असे लोढा डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा यांनी सांगितले.

‘भारतासह जगभरातील संशोधकांना गणित क्षेत्रातील अत्याधुनिक बदल व संशोधन पद्धती समजून संबंधित ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. तर गणितक्षेत्रात पी.एचडी.चे शिक्षण घेतल्यानंतर अधिकचे संशोधन सदर संस्थेत करता येणार आहे’, असे लोढा गणितीय विज्ञान संस्थेचे संचालक व गणितज्ज्ञ डॉ. व्ही. कुमार मूर्ती यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

भारतीय संशोधकांना जगात ओळख मिळेल : आशिष कुमार सिंह

लोढा गणितीय विज्ञान संस्थेत अध्यापन व पूर्व संशोधनावर अभ्यास करण्यापलीकडे गणित क्षेत्रात पूर्णवेळ प्रत्यक्ष स्वरुपात संशोधन करता येणार आहे. या संस्थेमुळे भारतातील संशोधनाला व संशोधकांना जगात मान्यता मिळून वेगळे स्थान प्राप्त होईल. संबधित संशोधन भारताच्याच नावाने ओळखले जाईल. या संस्थेमुळे गणित क्षेत्रातील अत्याधुनिक बाजूंवर संशोधन केल्यामुळे नवनिर्मिती होईल, असे लोढा फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक आणि माजी सनदी अधिकारी आशिष कुमार सिंह यांनी सांगितले.