मुंबई : महायुतीतून लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ३०, शिवसेनेकडून १३ आणि राष्ट्रवादीकडून पाच जागा लढवण्याचे सूत्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अमान्य केले असून आपल्या वाटयाला अधिक जागा याव्यात असा आग्रह धरला आहे. त्यातच मनसेच्या महायुतीतील समावेशासही शिंदे यांनी विरोध केला आहे. दुसरीकडे, भाजपने ठाण्याच्या जागेवर दावा केल्याने जागावाटपाचे घोडे पुढे सरकेनासे झाले आहे.

कुणी, किती जागा लढवायच्या या मुद्दयावरच महायुतीत अद्याप रस्सीखेच सुरू आहे. भाजप २९ किंवा ३०, शिंदे गटाला १३ ते १४ जागा आणि अजित पवार गटाला पाच जागा सोडण्याच्या सूत्रावर चर्चा झाली. मात्र, त्याला दोन्ही मित्रपक्षांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)  सुनील तटकरे हे एकमेव खासदार असले तरी त्यासह बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव व परभणी या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे तर, शिवसेनेकडे (शिंदे गट) १३ खासदार असल्याने त्यांना त्याहून किमान  दोन-तीन अधिकच्या जागा हव्या आहेत.  महायुतीतील मनसेच्या समावेशानेही समीकरणे बिघडली आहेत. राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक या तीन जागांची मागणी केली आहे. यापैकी शिर्डी आणि नाशिकमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत. महायुतीमध्ये मनसे आल्यास दक्षिण मुंबई किंवा अन्य जागा देऊन ३०-३१ जागा लढविण्याचे भाजपचे नियोजन आहे. मात्र, राज ठाकरे यांचा महायुतीत समावेश करण्यास शिंदे यांचा आक्षेप असल्याचे समजते. शिंदे यांनी ही बाब भाजप नेत्यांच्या कानी घातली आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024: आघाडीतील तिढा सोडविण्याचे प्रयत्न; ‘वंचित’चा पर्याय संपुष्टात 

जागावाटप अंतिम करण्यासाठी, मनसेबाबत निर्णय आणि भाजपचे उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासाठी महायुतीचे नेते दोन-तीन दिवसांत पुन्हा नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. काही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडून ठाण्याची मागणी

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघावर अद्यापही सहमती झालेली नाही.

* ठाणे, कल्याण, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या शिवसेना शिंदे गटाला आणि रायगडची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडल्यास भाजपला मुंबई वगळता कोकणात फक्त भिवंडीची जागा वाटयाला येते.

* ठाण्यात शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नाही. यामुळे ठाण्याची जागा भाजपला सोडून कोकणात तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय साधला जाईल, अशी भाजपची भूमिका आहे.