गेल्या तीन महिन्यांपासून देशात मोदींची लाट आहे की नाही, या भोवती फिरणारे चर्चेचे चक्र शुक्रवारी अखेर थांबले. देशात मोदींचीच लाट असल्याचे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशावरून स्पष्ट झाले. देशातील मतदारांनी भाजपच्या पारड्यात इतके भरभरून मत टाकले आहे की त्यांना सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही मित्रपक्षांचीही गरज पडणार नाही. एकूण २८५ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३८ जागांवर विजय मिळवला असून, कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला शतकाचा आकडाही गाठता आलेला नाही. यूपीएला ५७ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.
देशातील जनतेने अत्यंत विचार करून मतदान केले असल्याचे निकालांवरून स्पष्ट होते आहे. मतदारांनी एकीकडे तिसऱया आघाडीतील पक्षांना कात्रजचा घाट दाखविताना नवनिर्माणाची स्वप्ने दाखवणाऱया मनसेलाही मतदारांनी नाकारले आहे. गेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दुसऱया क्रमांकावर असलेला मनसे यावेळी तिसऱया किंवा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. नाशिक महापालिकेत सत्ता असलेल्या मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांचे लोकसभा निवडणुकीत डिपॉझिटही जप्त झाले आहे.
मोदींच्या लाटेमध्ये अनेक प्रस्थापितांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पवनकुमार बन्सल, लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार, कपिल सिब्बल, नंदन नीलेकणी, छगन भुजबळ, प्रिया दत्त, पद्मसिंह पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही भाजपच्या स्मृती इराणी यांनी कडवी टक्कर दिली. सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये राहुल गांधी या मतदारसंघातून पिछाडीवर होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आघाडी घेत अमेठीतून विजय मिळवला. नरेंद्र मोदींनी वडोदरामध्ये तब्बल पाच लाख ७० हजार इतक्या विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवत काँग्रेस उमेदवार मधुसूदन मेस्त्री यांचा धुव्वा उडवला. वाराणसी मतदारसंघातून मोदींनी विजय मिळवत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेसचे अजय राय यांचा ६० हजार ६२५ पराभव केला.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांनी मोदींवर संपूर्ण विश्वास दाखविला असून, तेथून पक्षाचे ७१ उमेदवार निवडून आले आहेत. समाजवादी पक्षाला इथे ५ जागांवरच विजय मिळाला असून बहुजन समाज पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. कॉंग्रेसला राज्यात अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला.
गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्यांतून फक्त भाजपचेच उमेदवार विजयी झाले असून, कॉंग्रेसला इथे आपले खातेही उघडता आलेले नाही. उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारनेही मोदींच्या नेतृत्त्वाला मोठी साथ दिली आहे. बिहारमधून भाजपचे २३ उमेदवार लोकसभेत गेले आहेत.
पक्षीय बलाबल
भाजप – २८५
कॉंग्रेस – ४४
आम आदमी पक्ष – ४
डावे, तिसरी आघाडी आणि अन्य – २०६