तज्ज्ञांचा कानमंत्र; लोकसत्ता आरोग्यभानवार्षिकांक प्रकाशित

आहाराबद्दलचे गैरसमज आणि बदलती जीवनशैली यामुळे आहार आरोग्याचे साधन होण्याऐवजी विकारांना कसे निमंत्रण देतो, हे स्पष्ट करत महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे व आयुर्वेदतज्ज्ञ प. य. खडीवाले यांनी बुधवारी निरोगी आरोग्यमार्ग उलगडला. केवळ औषधे घेण्याकडे भर देण्यापेक्षा आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, असा कानमंत्र देतानाच आहार आणि व्यायाम हेच आरोग्यसूत्र आहे, असे मौलिक मार्गदर्शन या तज्ज्ञांनी केले. निमित्त होते, लोकसत्ता ‘आरोग्यभान’ वार्षिकांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे.

औषधे व महागडे उपचार यांच्या पल्याड जात बदलती जीवनशैली व वैयक्तिक आरोग्य यांची सांगड घालून आरोग्याचा निरामय दृष्टिकोन मांडणाऱ्या लोकसत्ता ‘आरोग्यभान’ वार्षिकांकाचा प्रकाशन समारंभ बुधवारी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातील पु. ल. देशपांडे सभागृहात मोठय़ा दिमाखात पार पडला. या समारंभाला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. डॉ. सुपे व वैद्य खडीवाले यांच्या हस्ते वार्षिकांकाचे प्रकाशन पार पडले. आहार, विकार, घरगुती उपचार, व्यायाम याबाबत मनात असलेल्या शंका, गैरसमज उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रश्न विचारले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करत प्रश्नांची उत्तरे देताना वैद्य खडीवाले यांनी आयुर्वेदाचे तत्त्व उलगडून सांगितले. तर डॉ. सुपे यांनी आहार व विकार यातला संबंध मांडला. समारंभाच्या सुरुवातीला ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘आरोग्यभान’ अंकाची संकल्पना मांडली. काळानुसार बदललेल्या जीवनशैलीला पूरक बदल आहारात करणे गरजेचे आहे, असा सल्ला वैद्य खडीवाले यांनी दिला. कोणतेही आजार, विकार उद्भवल्यास लगेच औषधांचा मारा करण्याऐवजी घरगुती इलाजांना प्राधान्य द्यावे. लसूण, पुदिना, आले, ओली हळद आणि तुळशीच्या पानांच्या चटणीचा आहारात समावेश केल्यास बरेचसे विकार कमी होतात. तसेच चिंच, लवंग, तेल यांचे मिश्रण योग्य रीतीने सेवन केल्यासही बऱ्याचशा आजारांवर नियंत्रण ठेवता येते, असेही खडीवाले यांनी सांगितले.

आहार आणि आरोग्य यांत समतोल राखला तर अनेक शारीरिक व्याधी टाळल्या जाऊ शकतात, असा कानमंत्र डॉ. सुपे यांनी दिला. जेवणात काबरेदकांसोबतच प्रथिने, जीवनसत्त्वे, लोहाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.

यासाठी कोंडय़ासह दळलेल्या गव्हाची चपाती, भाज्या, मांसाहार, कडधान्ये, गूळ यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश असावा. त्याच वेळेस साखर, मीठ आणि मैद्याचे प्रमाण कमी करावे किंवा शक्य असल्यास टाळावे. रोज थोडय़ा प्रमाणात दही सेवन केल्यास अनेक विकार कमी होतात, असा सल्ला डॉ. सुपे यांनी या वेळी दिला.

  • ‘युआरफिटनेस्ट’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून ‘साने केअर’ हे हार्ट केअर पार्टनर आहेत. तसेच हा कार्यक्रम पॉवर्ड बाय पुणे येथील ‘भारती संस्कृती दर्शन ट्रस्ट’, ‘लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’, ‘युअर मॉल’, ‘आयुशक्ती’ आणि ‘आरआयएसओ १०० टक्के राइसब्रान ऑइल’ आहे.