scorecardresearch

Premium

‘विश्वासार्हता गमावलेल्या समाजात कृती महत्त्वाची’

‘लोकांना एकत्र आणायचे असेल तर त्यासाठी कृती महत्त्वाची असते.

‘विश्वासार्हता गमावलेल्या समाजात कृती महत्त्वाची’

‘लोकांना एकत्र आणायचे असेल तर त्यासाठी कृती महत्त्वाची असते. पाणी फाऊंडेशनचे काम करताना मला या कृतीची गरज होती. समाजातील संवादाची विश्वासार्हता शून्य झालेली असताना लोकांना एकत्र आणणे हे कठीण असते. राजकीय व माध्यमांची विश्वासार्हता कमी होत असताना, आपली शिक्षण यंत्रणा असं काही करायला शिकवत नसताना, एखाद्या कामासाठी लोकांनी आपणहून का प्रवृत्त व्हावे हा प्रश्न निर्माण होतो. पण कृतीतून खूप फरक पडतो. मी स्वत: तो अनुभव घेतला. त्याचा मला आत्मिक आनंद तर मिळालाच, पण लोकसहभाग हा यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले.

‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात ‘आव्हान पाणीप्रश्ना’चे या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

‘जलसंधारण आणि लोकसहभाग’ या सत्रात त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामातील आपले अनुभव मांडताना एकूणच समाजाच्या मानसिकेतवरदेखील बोट ठेवले. जलसंधारणाच्या उपक्रमात लोकसहभाग कसा निर्माण होतो हे मांडताना ते म्हणाले, ‘‘पाणी प्रश्नावर काम करायचे असेल तर या कामाचा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. त्यासाठी लोकांमध्येच उतरून काम करायला हवे. तेव्हाच त्याची तीव्रता जाणवू शकते. जेव्हा मी या कामात प्रत्यक्ष उतरलो तेव्हा मला हा प्रश्न खऱ्या अर्थाने कळला. ही कृती माझ्यासाठी महत्त्वाची होती. माझ्याबरोबर सहभागी होणारे लोक केवळ मी आहे म्हणून तेथे आले नव्हते. जे केवळ माझ्यासाठी आले होते ते आपोआपच कमी झाले. इतकेच नाही तर गावोगावातून लोक या कामात सहभागी झाले होते. एकही पैसा मेहनताना न घेतादेखील लोक काम करत होते. एका गावात तर केवळ तीनच लोक काम करत होते. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहूनदेखील विश्वास बसणार नाही असे काम लोकांनी केले आहे. लोकांमधील ही ऊर्जा महत्त्वाची आहे.’’

पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमात काम करताना तेथील पाणीसंकटावर तर काम झालेच, पण मला स्वत:ला मिळालेला आत्मिक आनंददेखील महत्त्वाचा आहे, असे या वेळी गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले. पाण्यावर काम करण्यासाठी लोक यापूर्वी इतक्या मोठय़ा प्रमाणात का एकत्र आले नाहीत याबद्दल ते सांगतात की, लोकांना सतत कोणी तरी एक नायक हवा असतो. आज आपण प्रचंड मोठय़ा प्रमाणात सर्वच प्रकारच्या माध्यमांचा वापर करत आहोत. पण त्यातून नेमके काय घ्यायचे याची जाणीव आपल्याला नाही. त्यामुळे पाणीप्रश्नाची समस्या तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहत नाही तोपर्यंत शहरी मानसिकतेला त्याची तीव्रता कळू शकणार नाही. त्यासाठीच कृती महत्त्वाची असते. आजही आपल्या शहरातील नदी मरताना आपण एकही कृती करत नाही अशी आपली मानसिकता आहे. ही मानसिकता बदलणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘पाणी वाया घालविणाऱ्यांना शिक्षा करा!’

मालदीव, इस्रायल यांसारख्या देशात पाणी किंवा अन्न वाया घालविणाऱ्यांना शिक्षा दिली जाते. त्या देशात तसे कठोर कायदे आहेत. आपल्याकडे मात्र राजरोसपणे पाण्याची नासाडी केली जाते. हे रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना या वेळी केसरी पाटील यांनी केली.

राज्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून योग्य नियोजन आणि योग्य वापर हेच त्यावर उत्तर आहे. आजवर शेतीला कालव्याद्वारे पाणी दिले जात असे. मात्र त्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने धरणातील पाणी थेट पाइपद्वारेच शेतीपर्यंत पोहोचविण्याचे धोरण हाती घेण्यात आले असून ऊस शेतीसाठी ठिबक सिंचनही बंधनकारक करण्यात आले आहे.   – गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta badalta maharashtra

First published on: 22-06-2018 at 02:03 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×