मुंबई : ‘लोकसत्ता’च्या समाजाशी असलेल्या सर्वसमावेशी बांधिलकीच्या नात्यातून जे अनेकानेक उपक्रम राबवले जातात त्यापैकी ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा’ हा एक लोकप्रिय उपक्रम. महाराष्ट्रातील तमाम युवावर्गाला जोडणारा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्या करिअरचा पाया घालणारा हा उपक्रम गेली दोन वर्षे करोनाच्या भीषण साथीमुळे सगळे जगच ठप्प झाल्यामुळे होऊ शकला नव्हता. परंतु आता करोनाच्या सावटातून आपण बऱ्यापैकी बाहेर आलो आहोत. सर्व व्यवहार मार्गी लागले आहेत. त्यामुळे पुनश्च ‘हरी ओम’ म्हणत लोकांकिकांचे नवे पर्व नव्या दमाने आणि नव्या सळसळत्या ऊर्जेने सुरू होत आहे.
हेही वाचा >>> मुंबई : जे.जे.रुग्णालयात सापडला भुयारी मार्ग
गेल्या सहा लोकांकिका स्पर्धातून संपूर्ण महाराष्ट्र युवकांच्या नवनवोन्मेषशाली सर्जनशीलतेने, त्यांच्या कलाविष्कारांनी ढवळून निघाला होता. एक रसरशीत नाटय़चळवळ त्यातून जन्माला आली; जिची तोवर वानवा होती. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर अशा आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेने विशेषत: ग्रामीण भागातील युवकांना आपला हुन्नर दाखविण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ त्याद्वारे मिळाले. करोनाने गेली दोन वर्षे त्यात खंड पडला होता. एका अर्थी तरुणाईच्या सृजन-उद्रेकाचीच त्यातून कोंडी झाली होती. कॉलेजजीवनातच आपल्या आविष्कारांतून कलेच्या क्षेत्राची कवाडे खुली होण्याचा हा मार्ग अलीकडच्या काळात राजरस्ता झालेला आहे. त्याला गेली दोन वर्षे ही मुले मुकली होती. हे नुकसान कदापि भरून येणारे नाही. परंतु आता नव्याने ‘लोकांकिका स्पर्धा’ सुरू होत असल्याने तरुणाईला हा राजमार्ग पुन्हा एकदा खुला होत आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला तरुणाईचा मिळणारा प्रचंड प्रतिसादच याची ग्वाही देतो. गेल्या सहा वर्षांच्या प्रतिसादाचा मागोवा घेतला असता दरवर्षी या स्पर्धेत शंभर ते दीडशे महाविद्यालये सहभागी होतात. प्रत्येक एकांकिकेत लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, पडद्याामागचे कलाकार असे किमान दहा युवा रंगकर्मी धरले तरी साधारण एक ते दीड हजार युवक या स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेतात. शिवाय या स्पर्धेचे प्रत्यक्षदर्शी हेही उद्याचे नाटय़प्रेमी प्रेक्षकही या स्पर्धेतून घडत आहेत. या अर्थानेही ही नाटय़चळवळ आकारास आलेली आहे.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”
दुसरीकडे या स्पर्धेतून नवे ‘टॅलेन्ट’ हुडकून त्यांना मालिका, नाटक, चित्रपट या कला-माध्यमांतून संधी देऊ इच्छिणारे निर्माते, दिग्दर्शक आदी सृजन प्रक्रियेतील मंडळी टॅलेन्ट पार्टनर आयरिस प्रॉडक्शनच्या सहकार्याने पुढे येत आहेत. करिअरच्या वाटा धुंडाळणाऱ्या युवा रंगकर्मीसाठी ही जणू अलिबाबाची गुहा खुली होण्याची सुसंधीच! त्यामुळे निव्वळ आपल्यातील सर्जनशीलता दाखवण्याचे व्यासपीठ या मर्यादित परिघाबाहेर जाऊन नवी क्षितिजे खुणावणारे व्यासपीठ हीसुद्धा लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची व्यापक ओळख आज आहे. तेव्हा सज्ज व्हा.. आपल्या उत्कट रंगाविष्कारांसाठी.. आणि उद्याच्या सोनेरी भवितव्याची कवाडे खुली करण्यासाठी.
कधीपासून?
येत्या ३ डिसेंबरपासून ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि टॅलेन्ट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ तसेच ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आज, शनिवारी, ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची घोषणा करण्यात येत आहे.