ठाण्यात आज, उद्या ‘मार्ग यशाचा’

पालकांच्या प्रचंड अपेक्षा, भयंकर स्पर्धा यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमधील ताण वाढत चालला आहे.

करिअरची निवड हा अत्यंत महत्त्वाचा विषय. शैक्षणिक वाटचालीमधला मैलाचा दगडच. पण आपल्यापुढे करिअरच्या कोणकोणत्या वाटा आहेत? कोणते मार्ग कसे विस्तारतात? याचा उलगडा झाला तर निवड थोडी अधिक सोपी होते. म्हणूनच ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आज, शुक्रवार १९ आणि शनिवार २० मे रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे हा कार्यक्रम होणार आहे. वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ या वेळी मार्गदर्शन करतील.

या करिअर कार्यशाळेचे उद्घाटन ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) सत्यनारायण यांच्या हस्ते होईल. ते या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० मे रोजी उल्हासनगरचे महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

पालकांच्या प्रचंड अपेक्षा, भयंकर स्पर्धा यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमधील ताण  वाढत चालला आहे. तो कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे, याबद्दल प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजेंद्र बर्वे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

करिअरची जडणघडण या विषयावर प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दहावी-बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा याबद्दलही ते विशेष मार्गदर्शन करतील.

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गरजेची असलेली ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा, तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘जेईई’ ही परीक्षा यांना अत्यंत महत्त्व आलेले आहे.

पण त्या परीक्षांमध्ये कसे यश मिळवावे, त्यासाठी अभ्यासाच्या युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतील, या विषयातील तज्ज्ञ शिक्षक, प्रा. किशोर चव्हाण, प्रा. काटदरे आणि प्रा. डॉ. कुर्वे. सोबतच जेईई २०१६चा टॉपर प्रिय शहासुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांसोबत त्याचे अनुभव शेअर करायला येणार आहे.

प्रवेशिका कुठून मिळवाल?

  • प्रत्येक दिवसाचे ५० रुपये इतके शुल्क भरून प्रवेशिका मिळतील. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात खालील ठिकाणी प्रवेशिका मिळतील-
  • हॉटेल टिपटॉप प्लाझा- एलबीएस मार्ग, ठाणे (प.)
  • लोकसत्ता कार्यालय, ठाणे- दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या मागे, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (प.)
  • विद्यालंकार- ईशान आर्केड, तिसरा मजला, हनुमान मंदिरासमोर, गोखले मार्ग, ठाणे (प.)
  • यासोबत ऑनलाइन प्रवेशिकाही उपलब्ध आहेत.
  • townscript.com/e/loksatta-marga-yashacha-330402

प्रायोजक

अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई या कार्यक्रमाचे टायटल पार्टनर आहेत. तर, विद्यालंकार आणि एमआयटी-आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे हे असोसिएशन पार्टनर आहेत. आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स हे सपोर्टेड बाय पार्टनर आहेत. युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, सासमिरा, विजय शेखर अ‍ॅकॅडमी आणि लक्ष्य अ‍ॅकॅडमी हे पॉवर्ड बाय पार्टनर्स असून ‘युअरफिटनेस्ट’ या कार्यशाळेचे हेल्थ पार्टनर आहेत.

विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आवश्यक

डिजिटल मीडियातील करिअरविषयी याच क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ मिहीर करकरे माहिती देतील. खेळाडू होण्यापलीकडेही खेळामध्ये जे करिअर आहे, त्याविषयी नीता ताटके आणि वर्षां उपाध्ये या क्रीडातज्ज्ञ माहिती देतील. जाहिरात क्षेत्रातील उच्चपदस्थ अभिजित करंदीकर जाहिरात विश्वातले करिअर उलगडून दाखवतील. तर आवाजातील करिअरविषयी सुप्रसिद्घ आरजे रश्मी वारंग माहिती देतील. या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. तसेच सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta marg yashacha in thane