शाश्वतसंस्थेच्या माध्यमातून आदिवासींसाठी हिरडय़ाला बाजारभाव मिळवून देण्यासाठीचा लढा, स्थानिकांसह आढुण्याची देवराई वाचवण्यासाठी दिलेला लढासरकारच्या रोजगार हमी योजनेत पडकईसमाविष्ट करण्यासाठीचे आंदोलन, डिंभे धरण आदिवासींच्या ताब्यात देण्यासाठीची चळवळ.. आदिवासी, दलित, स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध सातत्याने सत्याग्रह, आंदोलनं करणाऱ्या आणि धारदार लेखणीनं अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत कुसुम कर्णिक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ या संस्थेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अत्यंत बुहमानाचा समजला जाणारा ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह’ हा पुरस्कार २०१२ मध्ये ‘शाश्वत’ संस्थेला मिळाल्यानंतर जगाच्या नकाशावर दुर्गम, मागासला समजलेला आंबेगाव तालुका, मंचर आदी भाग प्रकाशमान झाला. या कार्याच्या आणि म्हणूनच पुरस्काराच्या मानकरी आहेत, ‘शाश्वत’ संस्थेच्या संस्थापिका कुसुम कर्णिक! गेली पन्नास वर्षे आदिवासी, दलित, स्त्रिया, अपंग व इतरही वंचित-शोषितांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह, आंदोलनं, उपोषणं, धरणं, रस्ता रोको तसंच धारदार लेखणीनं अन्यायाला वाचा फोडणं आदी हत्यारं परजत सतत संघर्षांच्या धगधगत्या मशाली हाती घेऊन चालणाऱ्या या दुर्गेची सामाजिक कामाची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे.

जागतिक पातळीवर ‘शाश्वत’ला घेऊन जाणाऱ्या कुसुम यांची वाटचाल मन हेलावून टाकणारी आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या विविध आंदोलनांचा सखोल अभ्यास करत त्यात सक्रिय सहभाग तसंच आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रशिक्षण घेत, परिषदांमध्ये पेपर वाचणं, चर्चासत्रात सहभागी होणं असा तीनही अक्षांवरचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सामाजिक काम लोकाभिमुख, लवचीक, पारदर्शी आणि लोकशाही पद्धतीनं असायला हवं, या ठाम विश्वासानं कुसुम गेली पन्नास र्वष अविरतपणे काम करीत आहेत.  १९८१ पासून तर कुसुम कर्णिक अति पाऊस असणाऱ्या, दुर्गम, डोंगर-दऱ्यांच्या भीमाशंकरच्या परिसरात काम करीत आहेत. काही भागांत घनदाट जंगल आहे. काही ठिकाणी एस.टी.पण जात नव्हती तिथं मैलोन् मैलांची पायपीट करत जंगलातून मार्ग काढत कुसुम आदिवासी पाडय़ावर जात होत्या. तिथल्या लोकांचं जगणं समजून घेण्यासाठी बायांबरोबर पाण्याचे हंडे डोक्यावर आणत होत्या. शेताच्या कामातही मदत करत होत्या. इतकंच नव्हे तर त्यांच्याबरोबरच दोन घास खात होत्या. मात्र त्याच वेळी ‘उपडी पासली’ म्हणजे घरात खायला काही नाही म्हणून दोन तांबे पाणी पिऊन पोटाला पदर गुंडाळून उपडं झोपल्यानं भूक लागत नाही, असं तिथल्या बायांनी सांगितल्यावर मात्र त्यांची झोप उडाली. यांच्या भुकेचं निवारण झालंच पाहिजे, हा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यातून उभारलेल्या ‘शाश्वत’च्या कामातून हजारो आदिवासींच्या भुकेला आधार मिळाला आहे. या ‘शाश्वत’ची स्थापना करण्यात कुसुम यांच्याबरोबरीने त्यांचे पती आनंद कपूर होतेच, शिवाय महादेव कोळी, कातकरी, ठाकर आदी समाजांचे स्थानिक कार्यकर्तेही होते.

१९८३ मध्ये हिरडा उत्पादनाचा प्रश्न बिकट बनला. आदिवासींसाठी हिरडा हे पैसा मिळवण्याचं महत्त्वाचं जंगल उत्पादन. शासकीय अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतानं हिरडय़ाच्या भावाचे खेळ खेळत आदिवासींची लुबाडणूक केली जात होती. २०-२५ फूट उंचीच्या हिरडय़ाच्या झाडावर चढून १०-१५ किलो बहुगुणी हिरडा गोळा करून खाली उतरणं जोखमीचं काम असतं. हिरडा तुडवून, वाळवण्याचं कामही जिकिरीचं. पण त्याचा दर आदिवासींना फक्त १-२ रुपये किलो मिळत होता.  हा हिरडा सरकारी महामंडळाला विकून आदिवासींना रास्त दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी कुसुम यांनी घोडेगावला तहसीलदार कचेरीसमोर आंदोलन, उपोषण केलं. त्यातून हिरडय़ाला बाजारभाव मिळाला. या वेळी किसान सभेनं केलेल्या रास्ता रोकोत कुसुमसह अनेक आदिवासी सामील झाले. त्यातून धीट बनले, अन्यायाविरुद्ध जागे झाले.

१९८४ मध्ये आढुण्याची शेकडो र्वष पारंपरिक पद्धतीनं जतन केलेली देवराई तोडण्याचा घाट घातला जात होता. ‘क्रूर कुऱ्हाडा चमकेंगे। हम पेडोंसे चिपकेंगे।’ अशा घोषणा देत झाडांना मिठय़ा मारत ठेकेदारांच्या कुऱ्हाडीपासून झाडांना वाचवणाऱ्या  चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती आढुण्याच्या देवराईत झाली आणि देवराई वाचली. ही देवराई म्हणजे एक घनदाट आणि जैवविविधतेनं नटलेला संपन्न भाग. हे सर्व कुसुम यांनी ‘शेवटची वेल सुकते आहे’ आणि ‘Death knell of a sacred grove’ या त्यांच्या गाजलेल्या लेखातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं.

जागतिक पातळीवर चर्चिल्या गेलेल्या ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनात कुसुम यांचा सातत्यपूर्ण, सक्रिय सहभाग होता. मेधा पाटकर यांचं नेतृत्त्व बघून प्रेरणा मिळाली, असं त्या कृतज्ञतेनं नोंदवतात. धरणग्रस्तांना देशोधडीला न लावता मूळ वसतिस्थानात सन्मानानं आणि समृद्धीनं जगता यावं म्हणून ‘शाश्वत’ संस्थेनं अभिनव उपक्रम हाती घेतले. गाळपेर शेतीचा उपक्रम आदिवासींची भूक भागवायला उपयोगी पडला. ही जमीन सरकारी मालकीची असल्यामुळे शेती करण्याच्या हक्कासाठी सरकारशी संघर्ष करवा लागला. दुसरा उपक्रम ‘पडकई! तीव्र डोंगरउतारावर शेती करण्यासाठी दगडाचे बांध घालून लहान लहान भातखेचरं तयार करण्याचं काम खूप कष्टाचं. एकटय़ादुकटय़ाला न जमणारं हे काम भीमाशंकर भागात सामूहिकपणे सुरू आहे. त्याला स्थानिक भाषेत ‘पडकई’ म्हणतात. ‘पडकई’ सरकारच्या रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्याचं ‘शाश्वत’चं काम देशपातळीवर नावाजलं गेलं. यातून शेकडो आदिवासींना रोजगार मिळाला.

तिसरा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे धरणाच्या पाण्यात सुरू केलेली मत्स्यशेती! यासाठीचा लढा खूप गाजला. २००५ मध्ये डिंभे धरण ठेकेदाराच्या ताब्यात होतं. या धरणामुळे जमीन -घरं गेलेल्या आदिवासींना रोजीरोटी मिळणं हा त्यांचा हक्क होता. यासाठी कुसुम यांच्या पुढाकारानं स्थानिकांनी आंदोलन केलं. विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर यांनी हा प्रश्न धसाला लावायला मदत केली. नंतर ‘डिंभे जलाशय श्रमिक आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था, दिगद’ स्थापन झाली आणि एकोणीस गावच्या आदिवासींच्या ताब्यात हे धरण दिलं गेलं.

१९९५ मध्ये भीमाशंकरचं जंगल अभयारण्य म्हणून जाहीर झालं. त्यामुळे स्थानिकांचं विस्थापन होणार म्हणून कुसुम यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी लढा पुकारला. नंतर कुसुम यांनी इतर अभयारण्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर चार अभयारण्य परिषदा घेतल्या. ‘लोक विरुद्ध अभयारण्य’ हे समीकरण राष्ट्रीय पातळीवर बदलून ‘लोक आणि अभयारण्य’ हे नवं समीकरण तयार करण्यात कुसुम यांचा मोलाचा वाटा आहे.

तीन वर्षांपूर्वी आनंद कपूर यांचं आकस्मिक निधन झालं. वयोमानापरत्वे कुसुमही निवृत्तीच्या मार्गावर आहेत. मात्र, बुधाजी डामसे यांच्या नेतृत्वाखाली मीरा दांगट, प्रतिभा तांबे, सुलोचना गवारी, नामदेव भांगरे, मोतीराम गेंदगे, अशोक काळे, सायरा पठाण, सुगंधा डामसे, बबन मावळे, विठ्ठल आसवले, ताई लोहोकरे, तेजश्री आदी कार्यकर्ते ‘शाश्वत’ संस्थेचा कामाचा डोलारा पेलण्याचा प्रयत्न करताहेत. अर्थात त्यामागे आहेत ते कुसुम यांचे अथक परिश्रम! आता त्यांचे सारे लक्ष वेगळ्याच कामावर एकवटले आहे. भारतीय वनाधिकार कायदा हा आदिवासी, वनवासी यांच्यावर झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करणारा कायदा आहे. त्यासाठी ‘लढते रहेंगे’ ही जिद्द वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीही मनात जागी ठेवणाऱ्या जिंदा दिल कुसुम यांच्या कामाला सलाम!

कुसुम कर्णिक

शाश्वत ट्रस्ट, टेलिफोन एक्सचेंजजवळ, मंचर जिल्हा पुणे – ४१०५०३

९८२२०५२८६६

shashwattrustmanchar@gmail.com

  • ‘लोकसत्ता दुर्गा २०१७’चे टायटल पार्टनर  आहेत केसरी.
  • या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत देना बँक, व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स आणि राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायजर्स लिमिटेड.
  • एम्पॉवर्ड बाय निर्लेप.
  • नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta navdurga program 2017 kusum karnik
First published on: 26-09-2017 at 04:20 IST