अंध असूनही एअर इंडिया संस्थेत ३२ वर्षे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकपदी नोकरी करणाऱ्या, अंध महिला विकास समितीच्या तसेच ‘नॅब’च्या सचिवपदी काम करत असताना असंख्य अंध स्त्रियांना रोजगाराची संधी देत आर्थिक आत्मभान देणाऱ्या, हिमालयाच्या १७,५०० फूट उंचीचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या पहिल्या अंध महिला गिर्यारोहक म्हणून गौरव प्राप्त करणाऱ्या परिमला भट यांनी आता ‘स्नेहांकित’ संस्था स्थापन केली असून गेली १६ वर्षे त्यातर्फे अंधांना शिक्षण दिलं जात आहे. आत्तापर्यंत विविध विद्यापीठांची १६ हजार ऑडियो बुक तयार करण्यात आली असून अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळवून देण्याचे अवघड काम सध्या परिमला करीत आहेत. वयाच्या साठीतही अंधांसाठी वसतिगृह स्थापन करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत- परिमला भट.
रुईया-रुपारेलसारख्या नामांकित महाविद्यालयातून पदवी, त्यानंतर ‘निर्मला निकेतन’ संस्थेतून समाजकार्याची पदवी, एअर इंडिया संस्थेत ३२ वर्षे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकपदी नोकरी, गिर्यारोहणाची आवड जोपासताना हिमालयाच्या १७,५०० फूट उंचीचे शिखर पादाक्रांत करणाऱ्या पहिल्या अंध महिला म्हणून गौरव. आपल्या अवतीभवतीच्या डोळस महिलांनाही लाजवेल असा हा उत्तुंग प्रवास केला आहे तो एका अंध स्त्रीनं, परिमला विष्णू भट यांनी.आपल्या अवतीभवती व्यंगावर मात करणारे हजारो जण असतात, पण ते व्यंग निवारण्यासाठी विश्वात्म भावाने आयुष्य वेचणारे फारच विरळ. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी स्वत:च्या अनुभूतीतून प्रयत्न करणाऱ्या या दुर्गेची ही वाटचाल अनेक डोळसांच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालणारी.
‘कमला मेहता’ शाळेत तीन वर्षे अंध मुलांना शिक्षण, सततच्या प्रवासातून-भेटींतून अंधत्वाचं दु:ख जाणून घेत, अंध महिला विकास समितीची सचिव ते नॅबची सेक्रेटरी व महिला विभागप्रमुखपदी काम, १९८१ मध्ये मलेशियात अंध स्त्रियांसाठीच्या लीडरशिप प्रोग्रॅममध्ये भारतीय अंध स्त्रियांची परिस्थिती या विषयावर पेपरवाचन, ‘नॅब’च्या बैठकीच्या निमित्ताने जीनिव्हा, पाकिस्तान, मलेशिया अशा परदेशवाऱ्या, उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते झालेला सन्मान, असा भल्याभल्यांना अचंबित करणारा प्रवास त्यांनी केला आहे.
एअर इंडियातून निवृत्तीनंतर, २००१ पासून परिमला भट या अंधेरीत ‘स्नेहांकित’ हेल्पलाइन नावाची संस्था चालवीत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांत अंधांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सज्ज होण्याचं शिक्षण दिलं जात आहे. दहावीपासून ते पदवीपर्यंतच्या, अगदी स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तकंही ‘स्नेहांकित’द्वारे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहेत. राज्यातील विविध विद्यापीठांची तब्बल सहा हजार पुस्तके या संस्थेनं आत्तापर्यंत ऑडिओ स्वरूपात तयार केली आहेत.
अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक मिळवून देण्याचे मोठे अवघड काम सध्या परिमला करीत आहेत. अनेकदा शाळांमध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी लेखनिक मिळत नाहीत. अशा वेळी ‘स्नेहांकित’ या अंध विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाते. परिमला आणि त्यांच्या संस्थेच्या सातत्याच्या प्रयत्नांमुळे आता अनेक महाविद्यालयांतील मुलं रीडर- रायटर म्हणून काम करू लागली आहेत. परिमला करत असलेल्या प्रयत्नांच्या वृक्षांना आता फळंही येऊ लागली आहेत, आयएएस झालेली प्रांजल पाटील त्यांच्यापैकीच एक, प्रांजलला अंधत्वामुळे रेल्वेने सेवेत घेण्यास नकार दिला होता, पण प्रांजलने जिद्दीने याविरोधात लढा दिला, तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशही संपादन केले. असेच काही जण बँकेत तर काही खासगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
१९८१ मध्ये मलेशियात झालेल्या दौऱ्यानंतर, लगेचच ‘नॅब’तर्फे अंध महिला विकास समितीची स्थापना झाली आणि या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी परिमला यांच्याकडे आली. या संस्थेचं कार्यालय फाऊंटनला होतं आणि एअर इंडियाचं सांताक्रूझला. या दोन्ही दगडांवर पाय ठेवत त्यांनी वाटचाल केली. तीस वर्षांपूर्वी तेव्हा ‘नॅब’ने प्रथमच महाराष्ट्रातील दृष्टिहीन स्त्रियांसाठी दोन दिवसांचं अधिवेशन भरवलं होतं, तेव्हा त्यात दीडशे स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या वेळी व्यासपीठावरून परिमला यांनी अंध स्त्री केवळ लाभार्थी नव्हे, तर समाजाला सुविधा पुरविणारी उद्योजकही होऊ शकते, हा विचार मांडला. आजही त्यांच्या कामाचा मुख्य गाभा हाच आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अंधांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी त्या झटत आहेत. मग ती पिठाची चक्की असो वा सहलींचं आयोजन करून देणं, मेणबत्त्या बनवणं असो वा इतर लघुउद्योग याद्वारे अनेक अंध स्त्रियांमधील ऊर्जा जागृत करण्याचं श्रेय परिमला यांच्या प्रयत्नांना जातं. ‘नॅब’मध्ये काम करत असताना अंध स्त्रियांकडून त्यांनी कागदी पिशव्या, मोबाइल पाऊच, पणत्या, राख्या आदी बनवून घेतलं. त्यामुळे रोजगारनिर्मिती होई. या कामाचा परीघ वाढविण्यासाठी ठिकठिकाणांहून ऑर्डर्स मिळविण्यासाठीही परिमला अथक प्रयत्न करत होत्या. यातही विशेष म्हणजे त्यांच्या पुढाकारातून दर वर्षी सीमेवरील जवानांसाठी एक लाख राख्या पाठविल्या जात. मुख्य म्हणजे तीन-चार अंध स्त्रिया स्वत: जाऊन जवानांना राख्या बांधत.
वाचन आणि प्रवास-भटकंती ही परिमलांसाठी विरंगुळ्याची ठिकाणं. मित्र-मैत्रिणींसोबत त्यांनी अनेकदा गिर्यारोहण केले आहे. हरिशचंद्र गड, राजमाची, कळसूबाई, सुधागड, लोहगड असे अनेक गड त्यांनी काबीज केले आहेत. ‘हिमालयीन इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटनेरिंग’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गिर्यारोहणाचे महिनाभर प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी हिमालयात १७,५०० फुटांवरील शितिघर शिखरावर झेंडा रोवला. यातल्या अखेरच्या टप्प्यात त्यांना लोखंडी शूज घालून गिर्यारोहण करावे लागले, निसर्गही अनुकूल नव्हता; पण त्या प्रतिकूल परिस्थितीतही शारीरिक आणि मानसिक बळाच्या जोरावर त्यांनी हे आव्हान समर्थपणे पेललं. याचमुळे हिमालयात एवढय़ा उंचीवर जाणाऱ्या त्या पहिल्या अंध महिला गिर्यारोहक ठरल्या..
परिमला यांना जिद्दीचा संस्कार मिळाला तो बालपणापासून. यांच्या समृद्ध जडणघडणीसाठी लागणारं वातावरण त्याच्या घरातच होतं. वडील विष्णू भट हे ‘इंडियन एक्स्प्रेस’चे वरिष्ठ पत्रकार. त्यामुळं त्यांचं बालपण वांद्रय़ाच्या पत्रकार कॉलनीत साहित्याच्या व साहित्यिकांच्या सहवासात गेलं. त्यांची आई नमाताई भट या सोळा वर्षे ‘कमला मेहता अंध विद्यालय’मध्ये प्राचार्यपदावर कार्यरत होत्या. त्यांनी परिमला यांना अंधशाळेऐवजी सर्वसामान्य मुलांसोबतच शिक्षण दिलं.
या दुर्गेला आता अपेक्षा आहे ती समाजाच्या सहभागाची. अंध मुलांसाठी वसतिगृह उभं करावं, अशी या दुर्गेची वयाच्या साठीत इच्छा आहे. अंध विद्यार्थ्यांना राहायला जागा मिळत नाही, तर केवळ नोकरी करणाऱ्यांना जागा दिली जाते, ही उणीव दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्ञानदेवाच्या पसायदानातील ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ही ओवी स्वानुभवातून जगत, या दुर्गेनं डोळस समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे, हे नक्की..