डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते सेवाव्रतींना धनादेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील संस्थांना दानशूरांनी यंदाही भरभरून प्रतिसाद दिला. या दानयज्ञात सुमारे सव्वादोन कोटींचे दान टाकत दात्यांनी सेवाव्रतींना भक्कम पाठबळ दिले आहे. प्रसिद्ध समाजसेवक व आनंदवनचे प्रमुख डॉ. विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दानयज्ञाचा सांगता सोहळा शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रवींद्र नाटय़मंदिरात होणार आहे. यावेळी या संस्थांना धनादेशांचे वाटप करण्यात येईल.

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे सातवे वर्ष. या सात वर्षांत दानशूरांनी ७२ संस्थांना मदतीचा हात दिला आहे. या सर्वच संस्था विधायक कार्यासाठी उभ्या राहिलेल्या. विविध क्षेत्रांत काम करताना आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या संस्था. त्या सर्वाना जगविणे, त्यांच्या कार्याला पाठबळ देणे हे आपले कर्तव्यच हे जाणून ‘लोकसत्ता’ गणेशोत्सवात विविध क्षेत्रांत सेवाभावी काम करणाऱ्या संस्थांची माहिती देते. त्यात ‘लोकसत्ता’चा संबंध माध्यम म्हणूनच.

यंदा ११ संस्थांची माहिती या उपक्रमांतर्गत देण्यात आली. गरिबाघरची गुणवत्ता पैशाअभावी झाकोळून जाऊ नये, यासाठी प्रयत्नशील असलेली ‘विद्यार्थी विकास योजना’, सकळ ललित कला संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणारी ‘थिएटर अकॅडमी’, गतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत ‘आविष्कार’, निराधारांच्या आधारवड बनलेल्या ‘शांतीवन’ व ‘रचना ट्रस्ट’ आदी ११ संस्थांची माहिती उपक्रमांतर्गत देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचकांनी या उप्रकमास भरभरून प्रतिसाद देत या संस्थांना आर्थिक पाठबळ दिले. सुमारे सव्वादोन कोटींचे दान देत दानशूरांनी विधायक कार्यासाठी संस्थांचे हात बळकट केले आहेत. या दानयज्ञाची सांगता ३ नोव्हेंबरला समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. सोहळ्यात या संस्थांकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sarva karyeshu sarvada event held on 3 november
First published on: 29-10-2017 at 05:24 IST