मुंबई : कांदा महाबँक योजनेला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी कांद्यावर विकिकरण (रेडिएशन) प्रक्रिया करून शीतगृहात साठवणूक करण्याची कांदा महाबँक योजना आर्थिकदृट्या व्यवहार्य ठरणार नाही, असा सूर तज्ज्ञांकडून उमटला आहे. सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चून ठेकेदारांचे उखळ पांढरे करू नका. यशस्वी झालेल्या अन्य पर्यांयांचा अभ्यास करा, अशी मागणी केली जात आहे.
कांदा काढणीच्या वेळी कांद्याच्या दरात होणारी पडझड रोखून शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, या उद्देशाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी एक प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यात कांद्यावर विकिरण प्रक्रिया करणारे केंद्र आणि दोन लाख टन कांदा साठवणुकीसाठी शीतगृह उभारले जाणार आहे. यासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे माजी प्रमुख डॉ. किसन लवांडे म्हणाले, बीएआरसीने सन २००२ मध्ये प्रामुख्याने कांद्यावर विकिकरण करण्यासाठी लासलगाव येथे कृषी उत्पादन संस्कार केंद्र सुरू केले. २५० टनांचे शीतगृह देखील उभारले. या केंद्रावर किती कांदा विकिरण, साठवण करून देशात विकला किंवा निर्यात केला याचा अहवाल कुठेही उपलब्ध नाही. त्याची आर्थिक व्यवहार्यता किती आहे, नाही हे कधीच जाहीर झाले नाही. २००७ च्या दरम्यान राहुरी येथे हिंदुस्तान अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीने बीएआरसी व अनेक बँकांच्या मदतीने विकिरण व शीतगृह सुविधा उभी केली, त्याचाही तपशील उपलब्ध नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून कोणी त्याचा लाभ घेत नाहीत, हे विदारक सत्य आहे. लासलगाव आणि राहुरी येथे सुमारे १०० ते १२० कोटी रुपयांचा झालेला खर्च जवळपास वाया गेला आहे.
पाच टक्के नुकसान टाळण्यासाठी खर्च
विकिकरण तंत्राने केवळ कोंब येणे टाळता येते. ते प्रमाण सर्वसाधारण साठवण गृहात केवळ पाच टक्के इतके आहे. वीस ते पंचवीस टक्के वजनातील घट व पाच टक्के बुरशी किंवा जिवाणूजन्य रोगांमुळे होणारी घट थांबवता येत नाही. वजनातील घट टाळायची असेल तर त्यासाठी शीतगृह हवे. विकिरण सुविधेपासून शेकडो किलोमीटर दूर असणारे शेतकरी भाड्याची गाडी करून पाच ते दहा किलोच्या बॅगा भरून विकिरण करून परत आपल्या साठवणूक गृहात आणतील, हा खटाटोप आर्थिकदृष्ट्या न परवडणारा आहे. कांदा विकिरण करुन तो शीतगृहात साठवण्याचा खर्च किलोमागे जवळपास ६ ते ७ रुपये येऊ शकतो आणि ते केवळ पाच टक्के कोंब येण्याचे टाळण्यासाठी, हे एकूणच आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही, म्हणूनच ना शेतकरी, ना व्यापारी त्याचा उपयोग करतात, असेही लवांडे म्हणाले.
कांद्यासाठी विशिष्ट शीतगृहाची गरज
राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने चाकण येथील कलाबायोटेक या कंपनीच्या मदतीने वातानुकूलित साठवण गृहाचा अभ्यास केला, त्यात २५ ते २७ डिग्री सेल्सिअस तापमान व ६५ ते ७० टक्के आर्द्रता राखून कांदा साठवून अभ्यास केला. कांदा सहा ते आठ महिने केवळ १० – ११ टक्के घट येऊन टिकला साठवण गृहातून कांदा बाहेरच्या वातावरणात महिने दोन महिने ठेवला तरी त्याला कोंब आले नाहीत, अशा वातानुकूलित साठवण गृहात कांदा ठेवला तर ९० टक्के कांदा कोंब न येता सहा ते आठ महिने चांगला राहतो हे सिद्ध केले. कलाबायोटेकने मंचरजवळ पेठ येथे पुणे नाशिक रस्त्यावर दोन हजार टनाचे वातानुकूलित साठवणूक गृह उभे केले आहे. त्यात गेली दोन वर्षे नाफेड मार्फत कांदा साठवला जातो. अशा तंत्राला आणि उपक्रमांचा अभ्यास करून कांदा साठवणूक साखळी निर्माण करण्याची गरज आहे, अशी माहिती राजगुरुनगर येथील संशोधन केंद्रातून देण्यात आली.
विकिकरण फारसे फायदेशीर नाही
कांदा विकिकरण (रेडिएशन) प्रक्रिया फारशी फायदेशीर ठरलेली नाही. अनेक निर्यातदारांना विकिकरण केल्यानंतरही कांद्याला कोंब आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कांदा काढणीनंतर एका महिन्याच्या आत विकिरण प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे कमी काळात मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणे शक्य नाही. त्याऐवजी राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने कलाबायोटेकच्या मदतीने तयार केलेले विशिष्ट शीतगृह आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरले आहे, अशी माहिती राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगरचे संचालक डॉ. विजय महाजन यांनी दिली.