मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरविण्याची मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली असता भाजप नेत्यांनी त्याला सहमती दर्शविली असली तरी भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे कायम आहेत. भोंगे हटविण्याचा निर्णय कोणत्याही भाजपशासित राज्यांमध्ये झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गोवा, ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर , त्रिपुरा आदी राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोठेही आजान किंवा मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा निर्णय झालेला नाही. उत्तर प्रदेशात भाजप सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत मशिदींवरील भोग्यांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. तेव्हा भाजपच्या काही मंत्र्यांनी बंदीचा विचार करण्यात येत असल्याचे सूतोवाच केले होते. पण योगी आदित्यनाथ सरकारने आजान किंवा भोंग्यावर अद्याप तरी बंदी घातलेली नाही. गुजरात राज्यातही अशा प्रकारची बंदी नाही. अलीकडेच फेब्रुवारीमध्ये गांधीनगरमधील एका नागरिकाने मशिदींवरील भोंग्यांवर बदी घालावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली असता, उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजाविली आहे.

हिजाब, हलाल मटण यावरून कर्नाटकात सध्या वातावरण तापले असता राज ठाकरे यांच्या मागणीनंतर कर्नाटकात काही उजव्या संघटनांनी अजानवर बंदीची मागणी केली. मात्र, मुस्लीम समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे कर्नाटकमधील भाजपचे मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी सोमवारीच स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक वाजविण्याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे. त्यात भोंग्यावर बंदीचा समावेश नाही याकडे लक्ष वेधण्यात येते.

राज्यात भाजप आग्रही

राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मशिदींवरील भोंग्यांना भाजप, मनसे आणि सत्ताधारी शिवसेनेचाही विरोध असल्याने राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून अजान व नमाज अदा केली जात असेल, तेथे हनुमान चालीसा मोठय़ा  आवाजात लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

 तर भाजपशासित किती राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे काढण्यात आले, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अन्य भाजपशासित राज्यांची उदाहरणे देऊ नयेत. त्या राज्यांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना किती सोयी सवलती दिल्या, आपत्तीकाळात किती आर्थिक मदत दिली, पेट्रोल-डिझेलवरचा कर किती कमी केला व जनतेला दिलासा दिला, यासह अन्य बाबींची तुलना केली जाते का, असा सवाल केला.

राज्यघटनेनुसार प्रत्येकाला धार्मिक बाबी, पूजा-अर्चा, नमाज यांचे अधिकार आहेत. पण ते करताना इतरांना त्रास होऊ नये, हीच अपेक्षा आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

हनुमान चालिसा लावणाऱ्यांना सरबत, पाणी देऊ – अबू आझमी

मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का, असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सोमवारी केला. पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता त्याला थारा देणार नाही. मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको, असे आझमी यांनी स्पष्ट केले. वेगवेगळे उत्सव व विवाह समारंभातील डीजेंमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही. शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loudspeakers on mosques remain in bjp ruled states zws
First published on: 05-04-2022 at 04:08 IST