मुंबईमध्ये प्रथमच मोदकांसह भोजन.
वदनी कवळ घेता नाम घ्या माधवाश्रमाचे.
जुन्या आठवणीतले सात्त्विक, स्वादिष्ट आणि रुचकर भोजन दर महिन्याला संकष्ट चतुर्थीस अनलिमिटेड उकडीच्या मोदकांसह माधवाश्रमातच मिळणार आहे.
गिरगावातील पारेख पथवर हा मजकूर असलेला फलक नेहमीच लक्ष वेधून घेत असतो; पण गणेशोत्सवाच्या काळात त्याच्याच बाजूला आणखी एक फलक पाहायला मिळतो.
गणेश चतुर्थीनिमित्त उकडीचे मोदक मिळतील.
आगाऊ नोंदणी सुरू आहे.
हॉटेल माधवाश्रम.
उकडीचे मोदक हा गणपतीचा आवडता नवेद्य. म्हणून ज्यांच्या घरी गणपतीची स्थापना होते आणि ज्यांच्या घरी होत नाही अशा सगळ्यांच्याच घरी गणेशोत्सवाच्या काळात साजूक तुपातले मोदक आवर्जून तयार केले जातात. मग अनेकदा कोण किती मोदक खाणार याची स्पर्धा लागते. मोदक हा गोड पदार्थ असला तरी त्याच्या वेगळेपणामुळे तो अनेकांना गोडाच्या पदार्थामध्ये समाविष्ट करावासा वाटत नाही, इथेच त्याचं महत्त्व आणि वेगळेपण सिद्ध होतं; पण चांगले मोदक सर्वानाच बनवता येतात आणि सगळीकडे मिळतात असं नाही; पण गिरगावमधील माधवाश्रममध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सर्वाना आवडतील अशी पारंपरिक चव असलेले उकडीचे मोदक मिळतात.
पोटापाण्यासाठी म्हणून धोंडू साळवे यांनी कोकणातून मुंबईत येऊन चाकरमान्यांना पोटभर जेवू घालेल असे छोटेखानी हॉटेल उघडले होते. साळवे यांनी त्या काळी जेवण तयार करण्यासाठी विधवा महिलांना रोजगार दिला होता. पुढे कोर्टाच्या मागे पारेख स्ट्रीटवर मध्यमवर्गीयांसाठी उभे राहिलेले माधवाश्रम हे पहिले हॉटेल. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना आवडेल अशा सर्व सोयीसुविधांची पूर्तता माधवाश्रममध्ये त्या काळी करण्यात आली होती. आसपासच्या परिसरात सिनेमागृहे, काँग्रेस हाऊस व गिरगाव कोर्ट असल्याने हे हॉटेल अल्पावधीतच चांगले भरभराटीस आले. आत्तासुद्धा सावंतवाडी, खान्देश, कोल्हापूर येथून मुंबईत येणारी मराठी कुटुंबे निवासासाठी आणि पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणासाठी माधवाश्रमाचीच निवड करताना दिसतात.
गिरगावमधील चाळ संस्कृती लयास जाऊन टॉवर संस्कृती उदयास येत असताना माधवाश्रम आजही जिद्दीने उभे आहे. दर संकष्ट चतुर्थीस इथल्या मुदपाकखान्यात अमर्याद मोदक बनतात आणि मग मोदकप्रेमींची येथे रांग लागते. संपूर्ण मुंबई शहरात जेवणाच्या थाळीसोबत मोदक देणारे मुंबईतील हे एकमेव हॉटेल म्हणावे लागेल.
गिरगावमध्ये गणपती पाहायला येणारे गणेशभक्त माधवाश्रममध्ये आजही आवर्जून जेवतात. मात्र, पूर्वी येथे जेवणाच्या थाळीसोबत मोदक मिळत नसत. त्या वेळी ते इथे चांगले मोदक कुठे मिळतील, अशी विचारणा होत असे आणि त्यानुसार काही मोदकांच्या दुकानांकडे त्यांना वळवले जाईल. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या काळात १९९५ साली माधवाश्रममध्ये थाळीसोबत खास घरगुती उकडीचे मोदक देण्यास सुरुवात झाली. बनवण्याची घरगुती पद्धत आणि चवीला अमृततुल्य असणारे हे मोदक अल्पावधीतच लोकप्रिय झाले. तेव्हापासून चांगले मोदक म्हणजे माधवाश्रम हे समीकरणच होऊन गेले. पुढे भोजनासोबतही दर महिन्याला संकष्ट चतुर्थीस अनलिमिटेड उकडीचे मोदक खाण्यासाठी खवय्यांच्या रांगा लागू लागल्या आणि आजही हा सिलसिला सुरू आहे. आता तर शहरातील धावपळीमुळे घरातील गणपतींसाठीही येथे मोठय़ा प्रमाणात ऑर्डर दिल्या जातात. गणपतीच्या पहिल्या दिवशी काही हजार मोदक विकले जातात. एका मोदकाची किंमत सव्वीस रुपये असली तरी ती आकार आणि चवीच्या तोडीस तोड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला येथे मोदक मिळतील; पण तुमची ऑर्डर मोठी असेल तर त्याची आगाऊ बुकिंग करणं खूप गरजेचं आहे, हे मात्र लक्षात असू द्या.
हॉटेल माधवाश्रम
कुठे- १८, पारेख स्ट्रीट, प्रार्थना समाज, गिरगाव, मुंबई- ४००००४