मराठी भाषा गौरवदिनी राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागातर्फे या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना तर श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला जाहीर झाला आहे. डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कारासाठी अविनाश बिनीवाले यांची तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कारासाठी मराठी विज्ञान परिषदेची निवड झाली आहे. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले.

मराठी भाषा गौरव दिनाचा मुख्य कार्यक्रम मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये साजरा होणार असून त्या वेळी साहित्य व भाषाविषयक पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या वेळी मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर होणार आहे. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र  साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्टय़े सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र  राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १५ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही होणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे विधानभवन परिसरात, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ  बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृहनेते चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह विधीमंडळाचे सर्व सदस्य आणि पुरस्कारविजेते साहित्यिक, मराठी अभिमान गीताचे (लाभले आम्हास भाग्य.. गीत- सुरेश भट) समूहगायन करणार आहेत. संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहगीताचे गायन २७  फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पुरस्कारविजेत्या साहित्यिकांच्या अभिनंदनाचा ठरावही दोन्ही सभागृहांत मांडला जाणार आहे. तसेच या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्येही सकाळच्या सत्रात ११ वाजता व दुपार सत्रात ४ वाजता मराठी अभिमान गीताचे समूहगायन होणार आहे.

भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात, भिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथेही यंदा मराठी भाषा गौरव दिन मोठय़ा उत्साहात, ‘अमृताचिये मराठी’ या कार्यक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे. यात पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील ११  विद्यापीठांच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत मराठी भाषेची स्थित्यंतरे दर्शविणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम मराठी रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव राजभवन येथे साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत.

एसटीत मराठी वाचन सप्ताह

मुंबई : ज्येष्ठ कवी, कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळाकडून प्रत्येक बस स्थानकात २७ फेब्रुवारी ते ५ मार्च अखेर मराठी वाचन सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. त्यानिमित्ताने प्रत्येक बस स्थानकावर मराठी भाषेतील पुस्तके, ग्रंथ, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने यांच्या विक्रीची दालने उभारली जातील. विविध प्रकाशनसंस्था, पुस्तक विक्री केंद्र यांच्याद्वारे प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात पुस्तक विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मराठी पुस्तक प्रकाशनसंस्था आणि विक्री दुकानांना बस स्थानकांवर पुस्तक विक्री दालने उभी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विनामुल्य मोकळी जागा उपलब्ध केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhu mangesh karnik declare vinda karandikar lifetime achievement award
First published on: 23-02-2018 at 03:58 IST