मुंबई : बेशिस्त वाहतूक, असुरक्षित रस्ते आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे आदी कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांत प्राण गमावणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या भयावह आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात १२०७८ पादचाऱ्यांना अपघातांत जीव गमवावा लागला. यापैकी सर्वाधिक अपघात मुंबई आणि ठाण्यात झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाबरोबरच राज्यातील रस्तेही पादचाऱ्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपायोजना करूनही रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी झालेले नाही. महामार्ग पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांमध्ये एकूण १२ हजार ७८ पादचाऱ्यांना अपघातात प्राण गमवावे लागले. २०१७ मध्ये एक हजार ८२२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर  २०२१मध्ये दोन हजार ६७८ पादचारी मृत्युमुखी पडले. 

गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक रस्ते अपघात मुंबई शहरात झाले असून त्यांत एक हजार पाच पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ठाणे शहरात ४२० पादचारी दगावले आहेत. रस्त्यांवरील अपघातांतील १०० मृतांमध्ये सरासरी ५७ पादचारी असतात, असे आकडेवारीवरून निदर्शनास येते.

प्रशस्त, पण असुरक्षित

काही ठिकाणचे रस्ते प्रशस्त असले तरी ते ओलांडण्याच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. त्यामुळे वेगवान वाहने चुकवत जीव मुठीत घेऊन पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. त्यामुळे  वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यांच्या या बेशिस्तीमुळेही पादचाऱ्यांना प्राण गमवावा लागतो. त्याचबरोबर पादचाऱ्यांचा निष्काळजीपणाही त्यांच्या जीवावर बेततो.

स्कायवॉक, भुयारी मार्गाचा अत्यल्प वापर

पदपथांवरील फेरीवाले, अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहात नाही. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी मोठय़ा शहरांमध्ये स्कायवॉक आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले, मात्र त्यांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

दुर्घटनेस कारण..

* रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे

* बेशिस्त वाहनचालक, असुरक्षित रस्ते

* पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा 

वर्षनिहाय आकडेवारी

वर्ष       मृत्यू

२०१७   १,८२२

१०१८   २,५१६

२०१९   २,८४९

२०२०   २,२१४

२०२१   २,६७८

शहर      मृत

मुंबई   १००५

पुणे    ४०३

नाशिक २५२

नागपूर २९०

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra 12 thousand pedestrians killed in road accidents in five years zws
First published on: 22-08-2022 at 04:43 IST