मुंबई : कबुतरखान्यावरुन उफाळलेला वाद शमवण्यासाठी कबुतरखाने शहरापासून दूर स्थलांतरित करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र शहराबाहेरील जागांमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीचाही समावेश आहे. या सूचनेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे वन्यप्राण्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून त्याला पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. तेथे कबुतरखाना वसवण्याची कल्पनाही धक्कादायक आहे. कबुतरांचा वावर वाढल्यास त्याता तेथील परिसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विकासकामे किंवा इतर काही गोष्टींसाठी नेहमी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागाच पर्याय म्हणून का पाहिल्या जातात असा प्रश्नही यामुळे उपस्थित केला जात आहे.

कबुतरांना खाद्य टाकण्यावर बंदी घालण्यात आली असली तरी, त्यांच्या खाण्याची सोय इतर ठिकाणी करावी. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल, आरे वसाहत, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि रेसकोर्स या जागांचा वापर करावा अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. राष्ट्रीय उद्यान हे संरक्षित जंगल आहे. तेथे कोणताही अनधिकृत हस्तक्षेप नको. कबुतरखान्यासाठी अशा संवेदनशील क्षेत्राचा विचार होणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटत आहे.

कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. त्याचे मानवी आरोग्यावरच नव्हे, तर वन्यप्राण्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारख्या जैवविविधतेने परिपूर्ण आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी कबुतरखान्यांची कल्पनाच धोकादायक ठरु शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कबुतरांच्या विष्ठेत असणाऱ्या बुरशीचे कण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे श्वसनाचा त्रास, त्वचा रोग आणि अन्य आजार होण्याचा धओका निर्माण होतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हरिण, बिबट्या, माकडे यांसारखे अनेक प्राणी मुक्तपणे फिरत असतात. हे प्राणी कबूतराच्या विष्ठेच्या संपर्कात आले तर त्यांना फुफ्फुसांचा आजार, त्वचेचा संसर्ग किंवा पचनसंस्थेचा त्रास होऊ शकतो. हे संसर्ग काहीवेळा त्यांच्या जीवावरही बेतू शकतात. विशेषत: प्राणी आधीच एखाद्या आजाराने त्रस्त असतील किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

अन्नसाखळी बिघडण्याचा धोका

कबुतरांना खाद्य देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चणे, धान्य, मका यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे इतर वन्य प्राण्यांची अन्नसाखळी बिघडू शकते. हे कृत्रिम अन्न मिळाल्यामुळे काही प्राणी त्यांच्या नैसर्गिक आहाराकडे दुर्लक्ष करु शकतात. जे जैविक समतोलासाठी अत्यंत घातक ठरु शकते. दरम्यान, वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते संपूर्ण जैवविविधतेच्या दृष्टीने कबुतरखाना हे एक ‘इन्व्हेझिव्ह इंटरव्हेशन’ ठरते. हे केवळ पर्यावरणीय समतोल बिघडवते असे नाही, तर जीवसृष्टीच्या अनेक स्तरांवर संकट निर्माण करु शकते.

कबुतरांचा जसा मानवाला त्रास होतो, तसा त्रास प्राण्यांनाही होणार. जसे इतर पक्षी, प्राणी स्वत:चे खाद्य मिळवायला प्रयत्न करतात तसेही कबूतरांनाही करुदे, त्याच्यासाठी कबूतरखान्यांची काय गरज आहे. तसेच उच्च न्यायालयाने आदेश दिला असूनही मंत्र्याकडून असे उपाय सुचविले जात असतील तर हा सरळ उच्च न्यायालयाचा अवमान केल्यासारखेच आहे. स्टॅलिन डी, पर्यावरणप्रेमी, संचालक, वनशक्ती