महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचे चित्र दिसत आहे. अधिवेशनाला सुरूवात होताच विरोधकांची राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. अर्धा तास चाललेल्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी करत भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. आदर्श अहवालात दोषी ठरवण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या भ्रष्ट मंत्र्यांना का पाठिशी घालता, असा सवालही यावेळी विरोधकांनी उपस्थित केला.
याआधी, सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पाय-यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. टोल बंद करा, आदर्श अहवालातील दोषींवर आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा देत विरोधक विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यास विरोध दर्शवला होता.