गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा दहशतवादी जान मोहम्मद अली शेख याच्या अटकेवरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं एकूण ६ जणांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली असून त्यात जान मोहम्मदचा देखील समावेश आहे. जान मोहम्मद धारावीत राहत असूनही राज्यातील तपास यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का? असा सवाल करत विरोधकांनी टीका केली असताना आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी झाकिरला ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळून लावत एकूण ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याच प्रकरणात झाकिरला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयामध्ये मध्यरात्रीपासूनच हालचाल दिसू लागली होती. रात्री २ च्या सुमारास एटीएसचे वरीष्ठ अधिकारी देखील कार्यालयाबाहेर दिसून आले, तेव्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले. अखेर, रात्री ३ च्या सुमारास महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, यासंदर्भातली टिप दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडूनच आल्याची देखील माहिती मिळत आहे.

धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश? एटीएस प्रमुख म्हणतात…!

दिल्ली पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करत ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. जान महंमद शेख (वय ४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (वय २२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (वय ४७, रायबरेली), झिशान कमर (वय २८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (वय २३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. १९९३ साखळी बॉम्ब स्फोटांप्रमाणेच पुन्हा स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा कट असल्याची बाब समोर आली आहे.

पाकिस्तानचा डाव उधळला: अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या ट्रेनिंगमध्ये ISI चा सहभाग उघड

दाऊद कनेक्शन!

दाऊदचा भाऊ अनीश इब्राहिम याला हाताशी धरून आयएसआयने हे हल्ले घडवून आणण्याचे ठरवले होते. त्यासाठी शस्त्रे, स्फोटके व हातबॉम्ब वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जाणार होते. अटक केलेल्या सहांपैकी ओसामा व झिशान यांना पाकिस्तानात प्रशिक्षण मिळाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना आयएसआयकडून सूचना मिळत होत्या. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेशात स्फोट घडवून आणण्यासाठी काही ठिकाणांची टेहळणी करण्यास सांगण्यात आले होते. या दहशतवाद्यांपैकी मुंबईत राहणाऱ्या जान मोहम्मद अली शेख यानं मुंबई लोकलमध्ये रेकी केल्याचं देखील सांगितलं जात होतं. मात्र, महाराष्ट्र एटीएसकडून नंतर हा दावा फेटाळण्यात आला.