राज्यसभा, विधान परिषदेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असून, भाजपकडून सुरेश प्रभू आणि पीयूष गोयल या दोन केंद्रीय मंत्र्यांची नावे निश्चित झाली आहेत. काँग्रेसमध्ये मात्र उमेदवारीचा नेहमीचाच घोळ असून, उमेदवारी मिळावी म्हणून बडे नेते प्रयत्नशील आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला तीन जागा मिळणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. शिवसेनेने संजय राऊत, तर राष्ट्रवादीने माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल हे निवृत्त होत असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाईल. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दीड वर्षांपूर्वी हरियाणामधून राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. त्यांची मुदत जुलैअखेर संपत असल्याने त्यांना यंदा राज्यातून राज्यसभेवर पाठविले जाईल. तिसऱ्या जागेकरिता विदर्भातील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आज  आमदारांची बैठक

विधान परिषदेच्या आमदारकीकरिता पक्षात तीव्र चुरस लागली आहे. विद्यमान आमदार मुझ्झफर हुसेन यांनाच उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेश काँग्रेसने केल्याचे समजते. हुसेन यांच्यासह दीप्ती चवधरी आणि विजय सावंत हे निवृत्त होत आहेत. अल्पसंख्याक समाजातील अनेक नेत्यांनी प्रयत्न चालवले आहेत. . माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेसुद्धा इच्छुक आहेत. त्यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. गेल्या वेळी उमेदवारी जाहीर होऊनही ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने यंदा संधी मिळावी, असा दावा माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे. पक्षाच्या आमदारांची उद्या बैठक बोलाविण्यात आली आहे.

राहुल यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक

काँग्रेसमध्ये अविनाश पांडे यांची मुदत संपत आहे. राज्यसभेतील संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसला आक्रमक नेत्यांची गरज आहे. पक्षाच्या उमेदवाराचे नाव दिल्लीतच निश्चित केले जाईल. विद्यमान खासदार अविनाश पांडे यांना पुन्हा संधी द्यावी, अशी प्रदेश काँग्रेसने शिफारस केली आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राज्यातील नेत्यांची बैठक बोलाविली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे या वेळी उपस्थित