राज्य विधिमंडळाच्या आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने संघर्षांचा संकल्प केला़ हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिल़े दुसरीकडे, भाजप सरकारच्या काळातील घोटाळेबाजांवर कारवाईचा इशारा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारकडून जोरदार प्रत्युत्तराचे सूतोवाच केल़े
मुंबई : केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या काळातील घोटाळय़ास जबाबदार असलेल्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी या अधिवेशनातही चांगले कामकाज होईल, असा विश्वास व्यक्त केला. अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास सरकारची तयारी आहे. अल्पसंख्याक विकासमंत्री नबाव मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच फेटाळली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची योजना आहे.
हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सरकारने राज्यपालांना विनंती केली होती. मात्र, राज्यपालांनी काही शंका उपस्थित केल्या. त्यावेळी निवडणुकीसाठी आवश्यक कालावधी नव्हता. यावेळी अधिवेशनाचा कालावधी मोठा असल्याने निवडणुकीबाबत राज्यपालांना विनंती करण्यात आली असून, त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असल्याचेही पवार यांनी सांगितले.
नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाचे कामकाज रोखण्याच्या विरोधकांच्या इशाऱ्यावर बोलताना, आघाडीच्या नेत्यांनी विचारांती मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचे पवार म्हणाल़े कोणाचा राजीनामा घ्यायचा आणि कोणाचा नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. अनेक निर्णय सभागृहातील परिस्थिती पाहून होत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधक केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारवर कारवाई करीत असताना राज्य सरकार नमती भूमिका घेत असल्याबद्दल घटक पक्षांकडून व्यक्त होणाऱ्या नाराजीबद्दल बोलताना पवार म्हणाले, आम्ही गप्प बसलेलो नाहीत. आम्हीही ३० वर्षे कारभार केला आहे. कोणावर कशी कारवाई करायची याची कल्पना असून विरोधकांवरही कारवाई होईल. मात्र कारवाई करताना ती सरकारवरच उलटू नये याची खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनमध्ये अकडलेल्या राज्यातील मुलांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार केंद्राच्या तसेच तेथील भारतीय राजदूतांच्या संपर्कात आहे. केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. मात्र, देश आणि राजधानी माहित नसणाऱ्यांनी गप्प बसावे, नको ती वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवू नये, असा टोला पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला. राणे यांनी दिशा सालीयन यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही नाराजी व्यक्त करीत पवार यांनी, असे आरोप- प्रत्यारोप राज्याला शोभणारे नसून, महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे ही राज्याची संस्कृती नाही, असे नमूद केल़े
राज्यपालांनी छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाबाबत बोलताना पवार म्हणाले, छत्रपतींबाबत सर्वाच्या भावना तीव्र असतात. त्यामुळे बोलताना सर्वानी खबरदारी घ्यायला हवी. राज्यपाल तर महामहिम आहेत. त्यामुळे त्यांनी काय वक्तव्य केले, हे त्यांना कधीतरी भेटून विचारावे लागले, अशी टोलेबाजी पवारांनी केली.