मुंबई : खोके घेतल्याच्या रवी राणा यांच्या आरोपांमुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांना खूश करण्याकरिताच त्यांच्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सपन मध्यम प्रकल्पाच्या ४९५ कोटी २९ लाख रुपये किमतीच्या कामास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूरअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सपन नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे अमरावती जिल्हयातील अचलपूर तालुक्यातील ३३ व चांदुरबाजार तालुक्यातील दोन गावांमधील एकुण ६१३४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अछलपूर हा बच्चू कडू यांचा मतदारसंघ आहे. कडू यांची नाराजी दूर करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. त्यातूनच अचलपूर या त्यांच्या मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाच्या खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
