नगरसेवक संख्येत वाढीचा प्रस्ताव ; मुंबईत मात्र जैसे थे

पुढील वर्षी फे ब्रुवारी-मार्चदरम्यान १५ महापालिकांच्या तसेच सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. 

राज्यात महापालिका-नगरपालिकांमध्ये सदस्य वाढणार

मुंबई : बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यावर मुंबईवगळता अन्य महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या सदस्य संख्येत १५ टक्के  वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडय़ात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सध्या मुंबईसह २७ महापालिका आणि ३७९ नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे  महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित के ली जाते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग त्या शहरासाठी प्रभाग रचना करून त्याप्रमाणे निवडणुका पार पाडते. सध्या सन २०११ च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान १६ तर जास्तीत जास्त ६५ सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान ६५ तर जास्तीत जास्त १७५ पर्यंत आहे. मुंबई महापालिके त ही संख्या २२७ आहे.  करोनामुळे देशात सन २०२१ची जणगणना अद्याप सुरू  होऊ शकलेली नाही.  पुढील वर्षी फे ब्रुवारी-मार्चदरम्यान १५ महापालिकांच्या तसेच सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. 

 २०११च्या लोकसंख्येनुसार निवडणुका झाल्यास लोकांवर अन्याय होईल अशी भूमिका घेत महापालिकांमधील सदस्य संख्या वाढविण्याची भूमिका नगरविकास विभागाने घेतली आहे. प्रत्येक शहरांची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत कितीने वाढली आहे याची ठोस आकडेवारी उपलब्ध नसली तरी गेल्या १० वर्षांत  लोकसंख्या १५ टक्के  वाढ झाल्याचा अंदाज घेऊन  प्रत्येक महापालिके त नगरसेवकांची संख्या १५ टक्यांनी वाढविण्यात येणार आहे. अध्यादेशाच्या माध्यमातून महापालिका कायद्यात सुधारणा करून ही सदस्यवाढ करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई महापालिके बाबत सदस्य वाढविण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नसल्याने तेथील निर्णय मंत्रिमंडळाच होईल असेही सूत्रांनी सांगितले. 

३० तारखेपर्यंतची मुदत

महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील सदस्य संख्येबाबत येत्या ३० तारखेपूर्वी  निर्णय घ्यावा त्यानंतर आयोग कोणताही बदल स्वीकारणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सरकारला कळविल्यामुळे  सरकारच्या पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. बहुधा येत्या आठवडय़ातील मंत्रिमंडळ बैठकीत प्रभाग वाढीस मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cabinet meeting proposal to increase the number of corporators zws

ताज्या बातम्या