मागील वर्षीप्रमाणे यंदासुद्धा दहीहंडी साजरी होणार नाही की निर्बंधांच्या अटी घालून दहीहंडीला राज्य शासनाकडून परवानगी देण्यात येणार हे आज दुपारर्यंत स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेणार असून त्यामध्ये या संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. करोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. यावर आज चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दीड वर्षापासून देशभरात करोना ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या सण-उत्सवांवर करोनाचं सावट असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी सर्वच उत्सव रद्द करावे लागल्यामुळे गणेश मंडळांपासून ते दहीहंडी मंडळांपर्यंत सर्वांचीच निराशा झाली होती. गणेशोत्सव देखील मर्यादित स्वरुपात फक्त घरगुती प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर दहीहंडीला आणि इतर उत्सवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. वेगवेगळ्या दहीहंडी मंडळांनी राज्य सरकारने छोट्या प्रमाणात का असेना दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे.

मनसेची घोषणा….

एकीकडे राज्य सरकारने भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नसतानाच दुसरीकडे एका महिन्यापूर्वीच मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून हे जाहीर केलं आहे. बुधवारी दुपारी त्यांनी ही पोस्ट केली असून त्यामध्ये “विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. करोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंध लागू असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना दहीहंडी किंवा गणेशोत्सव या सणांना यंदा राज्य सरकारकडून परवानगी किंवा सूट मिळेल किंवा नाही, याविषयी संभ्र असताना राज्य सरकारने काही जाहीर करण्याआधीच मनसेनं विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मनसेप्रमाणेच घाटकोपर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राम कदम यांनीही यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय.

गेल्या वर्षी करोनामुळे दहीहंडी झाली होती रद्द

दरवर्षी मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये मोठ्या संख्येनं गोविंदा पथकं सहभाग घेत असतात. अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते देखील मोठमोठ्या दहीहंडींचं आयोजन करत असतात. त्यामुळे दहीहंडीच्या या पारंपरिक उत्सवामध्ये आर्थिक उलाढाल देखील मोठी होत असते. मात्र, गेल्या वर्षी करोनामुळे दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या वर्षी देखील तशाच प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता असताना त्याआधीच मनसेकडून अशा प्रकारे विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray to hold a key meeting with dahi handi coordination committee scsg
First published on: 23-08-2021 at 08:10 IST