दहा वर्षांहून अधिक काळ आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये काम करूनही सेवेत कायम नाही
गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये हंगामी म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना तीन महिन्यांत सेवेत कायम करण्याचे आश्वासन गेल्या वर्षी विधिमंडळात देऊनही त्याची पूर्तता न केल्यामुळे या डॉक्टरांनी आता मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येसाठी परवानगी मागण्याचा निर्णय घेतला आहे. गेले दहा दिवस हे डॉक्टर आझाद मैदानावर चक्री उपोषण करत असूनही आरोग्यमंत्र्यांसह कोणीही त्यांची दखल घेण्यास तयार नसल्यामुळे या टोकाच्या भूमिकेवर हे डॉक्टर आले आहेत.
आरोग्य विभागात आजही डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त असून ग्रामीण तसेच दुर्गम आदिवासी भागात जाण्यास ‘एमबीबीएस’ डॉक्टर तयार नसतात. गेल्या एक दशकाहून अधिक काळ ‘बीएएमएस’ असलेले सुमारे ८७१ डॉक्टर हे आदिवासी जिल्ह्य़ातील ४४३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करत आहेत. त्याचप्रमाणे १६८ आयुर्वेदिक डॉक्टर २८ हजार रुपये पगारावर भरारी पथकात काम करत असून दुर्गम भागात आरोग्य सेवेचा कणा बनून काम करणाऱ्या या डॉक्टरांना वेळोवेळी आश्वासन देऊनही सेवेत कायम करण्यात आरोग्य विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत तसेच त्यांच्यापूर्वीच्या आरोग्यमंत्र्यांकडे अनेकदा बैठका होऊन सेवेत घेण्याचे मान्य करण्यात आले होते. गेल्या वर्षी नागपूर येथील अधिवेशनात दीपक सावंत यांनी तीन महिन्यांत या डॉक्टरांना सेवेत घेण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते. तथापि याबाबत आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्यामुळे गेले दहा दिवस दररोज सुमारे शंभर डॉक्टर आझाद मैदानावर चक्री उपोषण करत आहेत. तसेच १५ ऑगस्टपासून ८५० डॉक्टरांनी सेवेत कायम करेपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘मॅग्मो आयुर्वेद’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव व सचिव डॉ. अरुण कोळी यांनी सांगितले. दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिवसाकाठी शंभरहून अधिक रुग्ण आम्ही तपासतो. बाळंतपणापासून शवविच्छेदनापर्यंत (पोस्ट मार्टेम) सर्व कामे आम्ही करतो. एवढेच नव्हे तर न्याय वैद्यक प्रकरणेही आम्ही हाताळत असून सोयीसुविधांची पर्वा न करता हंगामी म्हणून दहा वर्षे काम करत आहोत. आम्हाला साधे घर घ्यायचे असल्यास सेवेत कायम नसल्यामुळे कोणतीही बँक कर्जही देत नाही. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय असून टॉयलेटचीही सुविधा अनेक ठिकाणी नसताना कुटुंबासह राहून रुग्णांना सेवा देतो असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. आमच्यातील काही डॉक्टरांचा मृत्यू झल्यानंतर त्यांची कुटुंबे आज उघडय़ावर पडली असून शासनानेही त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आम्ही डॉक्टर आहोत का वेठबिगार, असा सवाल करत आता सेवेत कायम केले नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ‘आत्महत्या करण्यास आता आम्हाला परवानगी द्यावी,’ अशी मागणी करणारे पत्र पाठवणार असल्याचे या डॉक्टरांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन सांगितले. यापूर्वी एमबीबीएस अस्थायी डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात आले, मात्र आमच्याबातीत निर्णय घेताना टाळाटाळ करण्यात येते. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याची संतप्त भावनाही या डॉक्टरांनी व्यक्त केली.