मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सुमारे ७५ हजार पदांची भरती टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील ही पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा या कंपन्यामार्फत घेण्याचा निर्णय गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सरकारच्या विविध विभागातील ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील ही पदे भरण्याची मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सुरूवातीस ही पदे जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरण्याबाबची चाचपणी सरकारने केली. मात्र जिल्हा, विभागीय निवड मंडळाच्या माध्यमातून यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रीयेचा अनुभव फारसा चांगला नसून त्यात अनेकवेळा घोटाळय़ांचा आरोप झाला होता. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.