महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली़ राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला़  दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच्या कारस्थानानुसार मुंबईत छापेसत्र सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या पिता-पुत्रासह भाजपला लक्ष्य केल़े 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला़  याबाबतचे ध्वनिचित्रमुद्रण त्यांनी पेनड्राईव्हच्या माध्यमातून उपाध्यक्षांकडे पुराव्यासाठी सादर केले.

‘‘विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांच्या सत्ताधारी नेत्यांशी आणि इतरांशी झालेल्या संभाषणांमध्ये आपल्याबरोबरच माजी मंत्री गिरीश महाजन आणि अन्य भाजप नेत्यांना अडकविण्याचे षडम्यंत्र रचले गेल्याचे दिसून येत़े  विशेष सरकारी वकिलांच्या संभाषणात शरद पवार, अजित पवार यांच्यासह काही मंत्री, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांचा उल्लेख आहे. विरोधकांना संपविण्यासाठी अशी षडयंत्रे रचण्यात येत असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठविताना सत्ताधारी नेते, सरकारी वकील आणि पोलिसच विरोधकांना संपविण्यासाठी खोटे पुरावे तयार करुन गुन्ह्यांमध्ये अडकवीत असतील तर राज्यात लोकशाही शिल्लक आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला. सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले नाही, तर भाजप न्यायालयात जाईल़  आरपारच्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याविरुध्द मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कसे कारस्थान रचले गेले, याची इत्यंभूत माहिती आणि अनेक नेत्यांमध्ये झालेल्या संभाषणांच्या ध्वनिचित्रफीती आणि त्यातील तपशील विधानसभेत सादर केले. सुमारे १२५ तासांचे ध्वनिचित्रमुद्रण आपल्याकडे असल्याचे नमूद करत त्यातील अनेक ध्वनिचित्रफीती फडणवीस यांनी उपाध्यक्षांकडे सोपवल्या.

मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेत पाटील आणि भोईटे गटबाजी आह़े  महाजन यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी भोईटे गटाची बाजू घेऊन दुसऱ्या गटाला धमकी दिली व महाजन यांचा दूरध्वनी आला होता, असा आरोप करुन २०१८ च्या या पुण्यातील कथित गुन्ह्यात २०२१ मध्ये मुक्ताईनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. महाजन यांना मोक्का कायद्यानुसार कारवाईत कसे अडकविता येईल, यासाठी सरकारी वकील चव्हाण यांनी चाकूला रक्त लावून कसे ठेवावे, पोलिसांनी धाड कशी घालावी, साक्षीदार, पंच यांचे जबाब याविषयी सविस्तर सल्ला संबंधितांना दिल्याचे ध्वनिचित्रमुद्दण फडणवीस यांनी सादर केले. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार अनिल गोटे यांच्या सूचना काय होत्या, महाजन यांच्याबरोबरच फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल या नेत्यांनाही खोटय़ा गुन्ह्यांमध्ये अडकवायचे, याबाबत काय संभाषण झाले, याचा तपशील फडणवीस यांनी सादर केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदल्या व अन्य माध्यमातून किमान ३०० कोटी रुपये जमा केले होते, तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या संदर्भातील उल्लेख, मंत्र्यांकडे झालेल्या कथित बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांच्या संदर्भात सरकारी वकील चव्हाण व इतरांच्या संभाषणांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखांविषयी फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली.

मलिकांचा राजीनामा घ्यावा – फडणवीस

मुंबईतील निष्पापांचा बळी घेणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा आणि अनेक देशविरोधी कारवायांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर संगनमत करून अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांनी मोक्याच्या जमिनी खरेदी केल्या. मुनीरा यांची जमीन खोटे मुखत्यारपत्र तयार करुन विकत घेण्यात आली आणि त्यांना पैसेही देण्यात आले नाहीत. कुर्ला येथे त्यावेळी दोन हजार रुपये चौ.फूट दर असताना केवळ २५ रुपये चौ.फुटाने जमीन खरेदी केल्याचे दाखविले गेले व तीही रक्कम दिली गेली नाही. हसीना पारकर यांनी सुमारे ६०० कोटी रुपयांचे जमिनींचे व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. मलिक यांनी कुर्ला येथील जमीन बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या हसीना पारकर यांच्या हस्तकांकरवी खरेदी केली. अनिल देशमुख आणि संजय राठोड या मंत्र्यांचा राजीनामा आरोप झाल्यावर घेण्यात आला. मात्र, मलिक यांनी देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करुनही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वेगळा न्याय कशासाठी आणि त्यातून कोणता संदेश महाविकास आघाडीला द्यायचा आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला.

ध्वनिचित्रमुद्रण कोणी केले ?

फडणवीस यांनी सरकारी वकिलाच्या संभाषणाचे ध्वनिचित्रमुद्रण सभागृहात सादर केले. याचे चित्रीकरण किंवा ध्वनिफीत कोणी तयार केली असावी, याची चर्चा विधानभवनात सुरू होती. चव्हाण यांच्या कायार्लयातील हे सारे चित्रीकरण करण्यात कोणी तरी अंतर्गत हात असावा, असा संशय आहे. संभाषण हे फोन टॅप करून करण्यात आले असावे व त्यामागे काही यंत्रणांची मदत झाली असावी, अशी शक्यता वर्तविली जाते. गेल्याच आठवडय़ात नेतेमंडळींचे चोरून संभाषण ऐकल्याबद्दल पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता याकडेही लक्ष वेधण्यात येते.

सत्ताधारी गोंधळले

फडणवीस यांच्या गौस्यस्फोटानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते गोंधळले होते. ध्वनिचित्रमुद्रणच सादर केल्याने त्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे यावर चर्चा सुरू झाली. गृहमंत्री वळसे-पाटील हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच उत्तर देणार आहेत.

विधानसभेत उत्तर देणार – वळसे-पाटील

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांबरोबर त्यांनी सादर केलेली ध्वनिचित्रफीत आपण बघितलेली नाही. त्यामुळे त्यावर लगेचच भाष्य करता येणार नाही. विधानसभेतच त्याला उत्तर देऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला चित्रफितीचा पुरावा आणि त्यांनी केलेल्या आरोपांची गृहविभाग पडताळणी करेल, असे उत्तर नग विकास मंत्री एकनाथ िशदे यांनी दिले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडकवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी शरद पवार यांना तीस वर्षांपासून ओळखतो़  त्यांनी कधीही असे केलेले नाही, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government planning to lodged false case on bjp leaders devendra fadnavis
First published on: 09-03-2022 at 04:32 IST