मुंबई : गेली दोन वर्षे करोनाच्या संकटातून सावरलेल्या राज्यातील गोरगरीब जनतेची यंदाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने महत्वपूर्ण योजना आखली आहे. त्यानुसार, दारिद्रय़रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामलेत आदी वस्तू देण्यात येणार आहेत. वायदा बाजारातून या वस्तूंची तातडीने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच या योजनेवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून जनतेला खूश करणाऱ्या निर्णयांचा सपाटा लावला आहे. गेली दोन वर्षे करोना निर्बंधांमुळे घरकोंडीत अडकलेल्या जनतेला यंदा सर्वच उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरे करण्यास प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. आता श्रीमंत, मध्यमवर्गीयांबरोबरच गोरगरीबांनीही दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.

दारिद्रयरेषेखालील तब्बल एक कोटी ६२ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवारी निविदा मागविण्यात आल्या असून, निविदा दाखल करण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली.

निविदेबाबत शंका

अन्न व नागरी पुरवठा विभागाने एवढय़ा मोठय़ा धान्य खरेदीसाठी निविदा मागविताना केवळ दोनच दिवसांची मुदत कशी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शी होईल का, असा प्रश्न विचारत काही खास ठेकेदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची शंका पुरवठादारांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, एवढी मोठी खरेदी पारदर्शीपणे व्हावी आणि लोकांनाही चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाव्यात, यासाठीच या वस्तू वायदे बाजारातून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली. मुळातच वस्तू वायदे बाजारात नोंदणीकृत पुरवठादार असतात. तिथे निखळ स्पर्धा होऊन सरकारला कमी दरात चांगल्या दर्जाचा अन्नधान्य पुरवठा होतो. गेल्या वर्षी जुलैमध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या लोकांनाही मोफत तुरडाळ आणि अन्य अन्यधान्य पुरवठा करण्यासाठी वायदे बाजारातूनच खरेदी करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच शिक्कामोर्तब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. दिवाळी फराळाचे साहित्य पात्र कुटुंबांना मोफत द्यायचे की अल्पदरात, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.