मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका केली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारत सलमानविरुद्ध खटला दाखल केला आहे.
उच्च न्यायालयाने सलमानवर ठेवलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता केली होती. तसेच सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल, अशी शिफारस करणारा अहवाल सरकारी वकिलांकडून गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता.

काय आहे हिट अॅंड रन प्रकरण
२८ सप्टेंबर २००२ रोजी घडलेल्या या घटनेमध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून सलमान खानने मुंबईतील अमेरिकन बेकरीनजीकच्या पदपथावर झोपलेल्या चारजणांना आपल्या गाडीने चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर अन्यांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले. या प्रकरणी १३ वर्षांपासून सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
सलमानने जबाब नोंदवताना अपघात आपल्या हातून नव्हे, तर चालक अशोक सिंग याच्या हातून घडल्याचा दावा केला होता. सलमानचा हा दावा सत्र न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला. सलमानने गुन्हा केला नव्हता तर अपघात घडला त्या वेळेस त्याने घटनास्थळी जमलेल्या जमावाला चालकाविरुद्ध कारवाई करू, असे आश्वासित का केले नाही, त्याने पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची तक्रार का नोंदवली नाही, असे मुद्दे सत्र न्यायालयाने उपस्थित केले आहेत. एवढेच नव्हे, तर सलमानने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतल्याचे वा त्यांना वैद्यकीय मदत केल्याचे आणि पुन्हा पोलिसांसोबत घटनास्थळी आल्याचा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही, असेही सत्र न्यायालयाने नमूद केले होते.