राज्य सरकारकडून जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या दहा हजार पुस्तिका छापण्यात येणार आहेत. या पुस्तिकांसाठी राज्य सरकार तब्बल ४.५ कोटी रूपये खर्च करणार असल्याचे समजते. दीनदयाळ उपध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून हे वर्ष ‘गरीब कल्याण वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे.  त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारकडून या पुस्तिका छापण्यात येत आहेत. राज्यातील ४०० ग्रंथालयांमध्ये या पुस्तकांचे वाटप केले जाईल.

या पुस्तकांमध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचे वर्णन करण्यात आले आहे. हे पुस्तक वाचून ग्रामीण भागांमधील गरीब मुलांना प्रेरणा मिळेल, असे सरकारकडून सांगण्यात आले. राज्य सरकार प्रत्येकी ४५०० रूपये दराने १० हजार पुस्तकांची खरेदी करेल. यामध्ये प्रकाशकांकडून राज्य सरकारला ३० टक्क्यांची सूट दिली जाईल.

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या जाहिरातबाजीवर आठ कोटी

काँग्रेसकडून राज्य सरकारच्या या उधळपट्टीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या पुस्तकांसाठीचा खर्च  सरकारने नव्हे तर भाजपने उचलावा. दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा घाट भाजपने घातला आहे. त्यामुळे त्यांनीच या सगळ्याचा खर्च उचलावा. सरकारने एवढा खर्च करायला ही व्यक्ती कोण होती, हे मुख्यमंत्र्यांनी एकदा जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तसेच सावंत यांनी उपाध्याय यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी आणि अल्पसंख्याक समाजाविषयीच्या दृष्टीकोनावर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भाजप प्रदेश बैठकीवर कोटय़वधीचा खर्च ; मात्र नाटय़गृहाचे ७० हजाराचे भाडे थकविले