देशात करोना रुग्णसंख्येमध्ये काहीशी वाढ होत असल्याने सध्या चिंता सतावत आहे. दरम्यान महाराष्ट्रात मात्र चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राजेश टोपे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना रुग्णवाढीची गती कमी असून काही ठराविक ठिकाणी रुग्णवाढ होत असल्याचं म्हटलं आहे. स्थिती चिंताजनक नसून, चौथी लाट येण्याची लक्षणं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

“रुग्णवाढीची गती कमी आहे. महाराष्ट्रात १२५, १५० अशी रुग्णवाढ दिसत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा काही ठराविक जिल्ह्यांमध्येच ही वाढ दिसत आहे. याचा अर्थ चिंताजनक स्थिती आहे, चौथी लाट येणार असं काही नाही,” असं राजेश टोपे म्हणाले.

पुरेशा नमुन्यांअभावी जनुकीय चाचण्या रखडल्या ; प्रयोगशाळांना नमुने पाठविण्याचे पालिकेचे आदेश

“आमची जी केंद्र सरकारसोबत बैठक झाली त्यात त्यात देशाच्या सर्व आरोग्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं होतं. आम्ही त्यावेळी नीती आयोग, आयसीएमआर यांच्यासोबत मोकळ्या मनाने चर्चा केली. यावेळी रुग्ण वाढत असलेल्या दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी रुग्ण वाढत आहेत, मात्र गंभीर आजार नाही. तसंच घरात विलगीकरणातच लोक बरे होत अशी माहिती दिली. काळजी करण्याची गरज आहे इतकी ही वाढ नाही,” असं राजेश टोपेंनी सांगितलं.

‘महाराष्ट्रात तुलनात्मक तितके रुग्ण वाढत नाही आहेत. पण आपण लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या जास्त गतीने वाढली तर केंद्राच्या सूचनांनुसार उपाययोजना करु,” असं राजेश टोपे म्हणाले.

नवनीत राणा यांच्या लिलावतीमधील फोटोबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “फोटो काढणं हा नियमाचा भाग नाही. त्यासंबंधी चर्चा घडवून आणणं, राजकारण करणं हे योग्य नाही. चौकशीत काय समोर येईल त्यानंतर कारवाईचा निर्णय घेऊ. माहिती घेतल्यानतंर कायदेशीर बाजू तपासल्यानंतर निर्णय घेतला जाईल. लिलावती रुग्णालयाशी चर्चा केली जाईल”.