scorecardresearch

भोंग्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय; पोलीस प्रमुखांना दिले आदेश; म्हणाले “कोणीही असो…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातून पुन्हा एकदा ३ मेपर्यंतच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला आहे. त्यानंतर राजकीय पडसाद उमटताना दिसत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याची दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यानंतर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंनी काय इशारा दिला आहे?

“फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असू तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

दिल्लीमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर राज ठाकरेंचा जाहीर इशारा; म्हणाले “समोर जे कोणतं हत्यार…”

“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील,” असंही राज ठाकरे म्हणाले.

गृहमंत्र्यांचे आदेश –

भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी हे धोरण ठरवावं असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितंल आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून एक निर्णय घेणार घेतील, गाईडलाईन्स तयार करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, “एक दोन दिवसात राज्यासाठी एकत्रित असं धोरण ठरवलं जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल आणि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल”.

‘नवहिंदू ओवैसी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “अशा लवंड्यांना..”

“मी अनेकदा सांगितलं आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो,” असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra home minister dilip walse patil over loudspeaker issue sgy

ताज्या बातम्या