मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नव्या वादात अडकले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद सुरू असताना भ्रमणध्वनीवर ‘रमी’ खेळत असल्याची त्यांची चित्रफीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली असताना कृषिमंत्र्यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.
रोहित पवार यांनी रविवारी ‘एक्स’ समाजमाध्यमावर कथितरीत्या कोकाटे रमी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याची चित्रफीत प्रसृत केली. त्याबरोबर रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकू येत नाही, अशी टीका केली. त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली असून कोकाटेंनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपने ज्या पाच-सहा मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी नावांची यादी दिली आहे, त्यात कोकाटे यांचा समावेश आहे, असा दावा शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला. तर ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रमी…’ अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असताना यांना लाज कशी वाटत नाही, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोकाटेंवर तोफ डागली. कृषिमंत्र्यांची ही आठवी-नववी चूक आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल बच्चू कडू यांनी केला तर या सरकारला शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही, शेतकऱ्यांनीच आता धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
कोकाटे यांनी आरोप फेटाळले
नाशिक : विधिमंडळाचे नियम आपणांस माहिती आहेत. आपण भ्रमणध्वनीवर ’रमी‘ हा खेळ खेळत नव्हतो. डाऊनलोड झालेला खेळ बंद करत होतो, असा दावा कोकाटे यांनी केला. रोहित पवार यांनी अर्धवट चित्रफीत प्रसारित केली. पुढील भाग दाखवलाच नाही, असेही ते म्हणाले. या वेळी विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. हे रोहित पवारांचे रिकामे उद्योग आहेत. विधान परिषदेतील कामकाज ‘यूट्यूब’वर पाहण्यासाठी आपण भ्रमणध्वनी सुरू केला होता. ‘यूट्यूब’ सुरू केल्यावर जाहिराती येतात. त्या वेळी डाऊनलोड झालेला खेळ काढून टाकत होतो, असे कोकाटे यांचे म्हणणे आहे. विरोधकांना आपले सरकार कधीही येऊ शकणार नाही, याची जाणीव असल्यामुळे गरळ ओकणे आणि बदनामी करण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतल्याची टीकाही त्यांनी केली.
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
कोकाटे यांची वादग्रस्त विधाने
– शेतकरी पीक विम्याच्या पैशातून साखरपुडा, लग्न करतात.
– भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो.
– शेतीत पिकेच नाहीत तर काय, ढेकळाचे पंचनामे करायचे का?
कोकाटेंचा राजीनामा घ्या -सुप्रिया सुळे
नवी दिल्ली : कृषिप्रधान देशात महाराष्ट्राचे कृषिमंत्री विधानसभेत गेमिंग ॲपवर पत्ते खेळतात, ही कुठली संस्कृती आहे? ‘गेमिंग’वर बंदी आणावी यासाठी मुलांचे पालक मागणी करत असताना कृषिमंत्री रमी खेळतात? अशा कृषिमंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यापूर्वीही कोकाटे यांनी असंवेदनशीलता दाखवली होती. शेतकऱ्यांबाबत त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली. देशाच्या इतिहासात कोकाटेंइतका असंवेदनशील कृषिमंत्री झाला नव्हता, अशा शब्दांत सुळे यांनी कोकाटेंवर तोफ डागली.
कर्नाटक विधानसभेतही मंत्र्यांचे ‘प्रताप’
काही वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेत भाजपचे तत्कालीन मंत्री लक्ष्मण सावदी हे भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफीत बघत असल्याचे कॅमेरात कैद झाले होते. थोड्या वेळाने अन्य दोन मंत्री त्यांच्याबरोबर चित्रफीत बघत असल्याचेही दिसले. त्यावरून बराच वाद झाला होता. सावदी यांच्या राजीनाम्याची काँग्रेसने मागणी केली होती. तेच सावदी भाजपने उमेदवारी नाकारताच काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि सीमेवरील अथनी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडूनही आले.