शाळा सोडल्यानंतर वीस वर्षांनी परीक्षा

शाळा सोडल्यानंतर सुमारे २० वर्षांनंतर दहावीची परीक्षा देणाऱ्या ठाण्यातील ज्ञानेश्वर नगरमधील सुषमा शेलार (३६ वर्षे) ६१ टक्के गुण मिळवित उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलासोबत दहावीची परीक्षा देणाऱ्या सुषमा यांनी मुलापेक्षाही अधिक गुण मिळवून शिकण्याची जिद्द असेल तर सगळे अडथळे पार करता येतात, हे सिद्ध केले आहे.

मूळच्या सातारा जिल्ह्य़ातील छोटय़ाशा गावामध्ये वाढलेल्या सुषमा यांना आठवी झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. त्यानंतर तीन वर्षांत लग्न करून त्या ठाणे येथे राहण्यास आल्या. लहानपणापासून शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे शिकता आले नाही. लग्नानंतरही दरवर्षी सुगीच्या दिवसांमध्ये गावी शेतातल्या कामांसाठी जावे लागायचे. त्यामुळे शिकण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. यंदा मुलाची दहावीचे वर्ष असल्याने गेल्या वर्षी शेताच्या कामांसाठी गावी गेले नाही. मुलासोबत दहावीची परीक्षा देऊन शिकण्याची इच्छा पूर्ण करावी असे नवऱ्याने सुचविले आणि मी दहावीची तयारी सुरू केली, असे सुषमा शेलार यांनी सांगितले.

घरातील कामांमुळे पूर्ण वेळ अभ्यासासाठी मिळायचा नाही. परंतु नवरा आणि आठवीतली मुलगी घरकामासाठी मदत करायचे. इतक्या काळानंतर अभ्यास सुरू करताना खूप ताण येत होता. परंतु मुली आणि नवऱ्याने अभ्यास समजून घेण्यासाठी खूप मदत केली. परीक्षेच्या तीन महिने आधी घरातली जबाबदारी सांभाळण्यासाठी आईला गावाहून बोलावले होते. त्यामुळे परीक्षा देणे शक्य झाले. वर्षभर तारेवरची कसरत केल्यानंतर निकाल पाहून खूपच आनंद झाला, असे सुषमा यांनी मोठय़ा अभिमानाने सांगितले.

सुषमा यांना ६१ टक्के मिळाले असून त्यांच्या मुलाला ५२ टक्के मिळाले आहेत. पुढे काय शिकावे हे त्यांनी अजून ठरविलेले नाही. मात्र शिकून चांगली नोकरी करायची हेच त्यांचे स्वप्न आहे.