यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा अनोखा महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. दीपोत्सवाबरोबरच, पुन्हा एकदा गोविंदा पथके दहीहंडी फोडतील. फेटे उडवत लावण्यांचे फड रंगतील. त्यासाठी दोन हजार फेटे अमेरिकेत दाखल होणार आहेत. पर्यटन महामंडळ या सांस्कृतिक जल्लोषावर चार कोटी रुपये खर्च करणार आहे.
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर हे ठिकाण म्हणजे जागतिक पर्यटकांचे तीर्थक्षेत्र मानले जाते. जगभरातील सुमारे साडेतीन लाख पर्यटक दररोज या ठिकाणाला भेट देतात. दर वर्षी ३१ डिसेंबरला या ठिकाणी हॉलीवूडच्या कलावंतांची जत्रा भरते. अशा या आगळे महत्त्व असलेल्या जागी यंदा महाराष्ट्राची संस्कृती अधोरेखित होणार आहे. येत्या २२ सप्टेंबरला टाइम्स स्क्वेअरवर एमटीडीसी सांस्कृतिक उत्सव, अर्थात, मराठमोळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. अमेरिकेतील तसेच मेक्सिको आणि कॅनडामधील महाराष्ट्र मंडळे या उत्सवात सहभागी होणार असून दिव्यांची रोषणाई, मराठी खाद्यपदार्थाची रेलचेल, पारंपरिक मराठी वेशभूषा आणि मराठी सणांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मराठमोळ्या पद्धतीची साडी नेसण्याचे आणि मराठी फेटा बांधण्याचे प्रशिक्षण वर्गच या सांस्कृतिक उत्सवात आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
या उत्सवाच्या निमित्ताने, महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राचे आकर्षण ठरलेल्या ‘डेक्कन ओडिसी’ची ओळख करून देण्याचाही महामंडळाचा उद्देश आहे. आपल्याकडील दिवाळी नोव्हेंबरात येत असल्याने, त्याअगोदर होणाऱ्या या सांस्कृतिक उत्सवामुळे पर्यटकांना दिवाळी प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी महाराष्ट्रात येणे शक्य होईल, असाही आयोजकांचा विश्वास आहे.
मुंबईतील संकल्प आणि ठाण्यातील संघर्षच्या गोविंदा पथकांची दहीहंडी मनोऱ्यांची प्रात्यक्षिके हे टाइम्स स्क्वेअर महोत्सवातील आगळे आकर्षण असेल. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचे गायन ही आणखी एक सांगीतिक मेजवानी असेल. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी त्यांनी कोणतेही मानधन घेतलेले नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक असलेली एअर इंडिया दहा जणांना विनामूल्य प्रवास घडविणार आहे.
महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक संचिताची ओळख करून घेण्यास अनेक देश उत्सुक असून त्यांच्याकडून येणाऱ्या निमंत्रणांमुळे राज्यातील पर्यटनास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये दिवाळीचा जल्लोष!
यंदा भारतात नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. मात्र त्याआधीच या महिन्यातच अमेरिकेत दिवाळीचे फटाके फुटतील.

First published on: 17-09-2013 at 02:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra tourism to celebrate diwali at times square new york