मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिकांसाठी विविध विकासकामांच्या माध्यमातून मतपेरणी सुरू केली आहे. त्यानुसार महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिकांवर नगरविकास विभागाने निधी वर्षाव सुरू केला आहे.

राज्यात नोव्हेंबर-जानेवारी या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून कामांचा वर्षाव करताना तब्बल २,७७० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिका क्षेत्रात पायाभूत सुखसोयींच्या विकासासाठी १,३२० कोटींची विशेष तरतूद करण्यात आली असून नगरपालिका क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ७०० कोटी, महापालिका-नगरपालिसांठी विशेष रस्ता अनुदानापोटी ४४५कोटी, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींसाठी १०० कोटी, हद्दवाड झालेल्या महापालिकांसाठी १०० कोटी तर नगरपालिकांसाठी १०० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामांना मंजुरी देतानाच २० टक्के निधीही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून निधी वितरणाच्या शासन निर्णयांचा धडाका लागला असून आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.