मुंबई : वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटतर्फे ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ अंतर्गत प्रभावी जनसंपर्काबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोम (इटली) येथे २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

सहा खंडांतील एकूण ७६ आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी यंदा विविध संस्थांच्या संवाद, सामाजिक उत्तरदायित्व व जनसंपर्क प्रकल्पांचे मूल्यांकन केले. त्यामध्ये महापारेषणला ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट’ या श्रेणीत जगातील अव्वल तीन संस्थांमध्ये स्थान मिळाले. रोममध्ये होणाऱ्या ‘पीआरओ पीआर रोमन फोरम` या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा उपक्रम क्रोएशियातील अप्रिओरी वर्ल्ड एजन्सीतर्फे गेल्या १४ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या एजन्सीला चार प्रमुख जागतिक जनसंपर्क संघटनांचे पीआरसीए (पब्लिक रिलेशन्स अँड कम्युनिकेशन्स असोसिएशन), आयपीआरए (इंटरनॅशनल पब्लिक रिलेशन्स असोसिएशन), सीआयपीआर (चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स) आणि आयसीसीओ (इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) सहकार्य लाभले आहे.

सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व माध्यमात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. कृत्रिम बुध्दिमत्तेचा (एआय) वापर करून जनसंपर्क विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. भविष्यातही महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला.