तांत्रिक बिघाडांची माहिती दडवण्याचा महावितरणचा प्रयत्न; वीज आयोगाकडे तक्रार

वीज ग्राहकांना महिनाभरात किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे विश्वासार्हतेच्या निर्देशांकातून समजत असते.

तांत्रिक बिघाडांची माहिती दडवण्याचा महावितरणचा प्रयत्न; वीज आयोगाकडे तक्रार
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विद्युत यंत्रणेत किती तांत्रिक बिघाड झाले आणि त्यामुळे वीज ग्राहकांना किती काळ अंधारात बसावे लागले याचे तपशील देणारा विश्वासार्हतेचा निर्देशांक वीज नियामक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दर महिन्याला प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना गेल्या पाच महिन्यांत तो जाहीर करण्यात आलेला नाही अशी तक्रार सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे केली आहे.

वीज ग्राहकांना महिनाभरात किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे विश्वासार्हतेच्या निर्देशांकातून समजत असते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२२ नंतर हे निर्देशांक प्रसिद्ध केलेले नाहीत. याआधीही महावितरणने अशाच प्रकारे ही माहिती दडवली होती. तक्रार केल्यानंतर महावितरणने मागच्या वर्षी ती माहिती जाहीर केली. त्यानंतर पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये तक्रार केल्यानंतर जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांचे निर्देशांक प्रसिद्ध केले होते. महावितरणने जे काम स्वत:हून करायचे आहे त्यासाठी दर वेळी तक्रार करावी लागणे दुर्दैवी आहे. तक्रार केल्यानंतर काही तासांत तीन-तीन महिन्यांची माहिती प्रसिद्ध होते याचाच अर्थ ती माहिती तयार असते. पण लोकांपासून दडवली जाते. मार्च २०२२ च्या आकडेवारीनुसार या संपूर्ण महिन्यात राज्यात वीज खंडित होण्याच्या १४ हजार २०५ घटना घडल्या. ज्यामध्ये महाराष्ट्रातील अडीच कोटी ग्राहकांना एकूण ४१ हजार ४९५ तास अंधारात बसावे लागले. देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुणे विभागातील परिस्थितीही वाईटच आहे. मार्च २०२२ या महिन्यात पुणे विभागात वीज खंडित होण्याच्या ९२३ घटना घडल्या. ज्यामध्ये पुण्यातील३० लाख ग्राहकांना एकूण २९६१ तास अंधारात बसावे लागले, याकडे वेलणकर यांनी लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ‘बेस्ट’कडून सवलतीचा पास; मुंबई महापालिका आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी